Filmy Kissa Marathi : अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे असू शकते, हे अनेक कलाकारांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. काही कलाकारांना या क्षेत्रात यश मिळते, तर काहींना परतीचा मार्ग निवडावा लागतो. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी आपले करिअर बदलले आणि शेतीकडे वळले. यातील सर्वात उल्लेखनीय उदाहरण म्हणजे अभिनेता राजेश कुमार. बिहारच्या छोट्या गावात जन्मलेला आणि मुंबईतील चंदेरी दुनियेत करिअर करण्यासाठी आलेला राजेश कुमार सध्या पालघरमध्ये सेंद्रिय शेती करत आहे.
१९९९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा राजेश कुमार 'साराभाई वर्सेस साराभाई' या लोकप्रिय मालिकेतील त्याच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने हिंदी टेलिव्हिजनसह विविध चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला. मात्र, २०१७ नंतर इंडस्ट्रीत त्याला काम मिळवण्यात अडचणी आल्या. त्यामुळे, त्याने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
राजेश कुमारने पालघरमध्ये १७ एकर जमीन घेतली आणि शेतीला सुरुवात केली. मात्र, सुरुवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याने लावलेली झाडं पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि यामुळे त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं. यानंतर, आर्थिक संकटांचा सामना करत असताना, त्याने कर्ज घेऊन पुन्हा शेती करण्याचे ठरवले. दोन तीन वर्षे त्याने उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. पान, या दरम्यान काही कारणास्तव दुर्लक्ष झाल्याने शेती जळून गेली. आर्थिक नुकसानामुळे राजेश कर्ज बाजारी झाला. या सगळ्या अनुभवातून त्याला 'शेतकरी आत्महत्या का करतात?' याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
लॉकडाऊनच्या काळात राजेश कुमारने आपली शेती पर्यटकांसाठी खुली केली आणि त्याचे जीवन बदलून गेले. त्याने ५ एकर जमीन भाड्याने घेतली आणि सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. यासाठी मार्केटिंगचा अभ्यास आणि पर्यटकांसाठी शेतीची पर्यटनाची संकल्पना तयार केली. दूरदूरवरून पर्यटक राजेशच्या सेंद्रिय शेतीला भेट देऊ लागले. त्यांची मुलं शेतीत रमायला लागली, झाडं कशी लावायची, ती कशी वाढवायची याचे प्रशिक्षण घेत असताना मोबाईलपासून दूर राहायला लागली. राजेश कुमारला विश्वास आहे की, आजची मुलं शाळेतील शिक्षणापेक्षा अधिक ‘ऑफलाइन’ अनुभव घेत असताना चांगला प्रगतीचा मार्ग शोधू शकतात. त्याचं म्हणणं हे आहे की, शेतीत मुलांची आवड निर्माण झाल्याने त्यांचा मानसिक विकास होतो आणि ते अधिक रचनात्मक बनतात.
राजेशने अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडलेले नाही. त्याने छोट्या छोट्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणे सुरूच ठेवले आहे. आता तो एक यशस्वी शेतकरी म्हणून पालघरमध्ये ओळखला जातो. राजेशचा अनुभव हेच सांगतो की, जरी अभिनय क्षेत्रात अडचणी आल्या असल्या तरी त्याने शेतीतून आपला मार्ग शोधला आणि आपली ओळख निर्माण केली.
संबंधित बातम्या