Mukesh Khanna on Bollywood Celebrities: बॉलिवूड कलाकारांच्या पान-मसाल्याच्या जाहिरातीला अनेकांनी विरोध केला असून, आता प्रत्येक मुद्द्यावर बेधडकपणाने बोलणारे मुकेश खन्ना यांनीही या मुद्द्यावरून बड्या कलाकारांना घेरले आहे. एका मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले की, कलाकारांनी हे असले प्रकार करू नये. त्यांना हे समजायला हवं की, ते लोक जे काही करतील, सामान्य लोक त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतील. मुकेश खन्ना यांनी म्हटले की, त्यांनी या मुद्द्यावरून अक्षय कुमारची चांगली कानउघडणी केली होती आणि अमिताभ बच्चन यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. ‘शक्तिमान’ आणि ‘भीष्म पितामह’ यांसारख्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे मुकेश खन्ना या विषयी बोलताना म्हणाले की, ‘या लोकांकडे पैसे नाहीत का?’
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांना विचारण्यात आलं की, पान मसाल्यासारख्या गोष्टींचं प्रमोशन करणाऱ्यांना कलाकार म्हणून काही जबाबदारीचं भान आहे, असं वाटतं का? या प्रश्नाला उत्तर देताना मुकेश खन्ना म्हणाले, ‘सर, मी तर म्हणतो की, अशा कलाकारांना पकडून चोप द्या. हे सगळं मी बोललोही आहे. मी अक्षय कुमारला फटकारलं आहे. अहो, तो आरोग्याविषयी सजग माणूस आहे आणि त्याने अशी जाहिरात केली. अजय देवगण ही ‘जुबां केसरी’ बोलत आहे, आता शाहरूख खाननेही सुरुवात केली आहे.'
मुकेश खन्ना म्हणाले, ‘त्या जाहिरातीत कोट्यवधी रुपये खर्च होतात आणि तुम्ही लोकांना काय शिकवत आहात? वरून ते म्हणतात की, आम्ही पान मसाला नाही, सुपारीबद्दल बोलत आहोत. पण, त्याच नावाखाली गुटखा विकला जातोय. किंगफिशरच्या बाटलीची जाहिरात करणे म्हणजे किंगफिशर बिअरची जाहिरात करणेच आहे. याला फसवी जाहिरात म्हणतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही हे लोक अशा जाहिराती का करतात? त्यांच्याकडे पैसे नाहीत का? मी तर यांना म्हणालो देखील आहे की, या जाहिराती करू नका सर... तुमच्याकडे भरपूर पैसा आहे.’
मुकेश खन्ना म्हणाले की, त्यांच्या विनंतीनंतर अनेक कलाकारांनी आपला निर्णय बदलला आहे. काही कलाकार मागे हटले आहेत. अक्षय कुमारही या जाहिरातीतून मागे हटला आहे. अगदी अमिताभ बच्चन साहेबांनीही मला सांगितलं की, त्यांच्या जाहिरातीचा अशा प्रकारे वापर होणार आहे, हे त्यांना माहित नव्हतं. पण, आजही अशा कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती केल्या जातात, ज्यात ते रंग उधळताना दिसतात… काय तर जुबान केसरी! तुम्ही लोकांना एका बाजूने जुबां केसरी शिकवत आहात आणि दुसऱ्या बाजूने गुटखा खाऊ घालत आहात.'