मोहन गोखले हे मराठी हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव होतं. मात्र १९९९ साली हा प्रतिभावान कलाकार वयाच्या अवघ्या ४५ वर्षी हे जग सोडून गेला. मोहन गोखले हे लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे पती होते. मोहन गोखले यांचे निधनामुळे हे शुभांगी याना जबर धक्का बसला होता. त्या वेळी त्यांची मुलगी सखी ही केवळ ६ वर्षांची होती. एका मुलाखतीत मोहन गोखले यांचा अखेरच्या दिवसांबद्दल सांगताना शुभांगी गोखले सांगतात. मोहन गोखले यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती.
मोहन गोखले यांनी निधनाच्या काही दिवसआधी, १० मार्च १९९९ रोजी त्यांनी आपल्या घराच्या दरवाजावर कुसुमाग्रजांच्या ''डोळ्यात कशाला पाणी'' या कवितेतील शेवटची ओळ लिहून काढली होती. ज्याचे शब्द होते ती 'शून्यामधील यात्रा, वाऱ्यातील एक विराणी, गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी' असे त्या कवितेचं शब्द होते. या घटनेच्या १० दिवसांनी मोहन गोखले कमल हसन यांच्या हे राम या चित्रपटाचा शुटींगसाठी मद्रासला गेले. चित्रपटाचा काही भाग शूट केल्यांनतर २९ मार्च रोजी त्यांना मद्रास येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मोहन गोखले यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठीच चटका लावून जाणारी होती. मोहन गोखले गेले होते. मात्र त्यांच्या या कवितेच्या रूपात त्यांच्या घरच्या दरवाजावर ते कायम घर करून राहिले. कालांतराने जेव्हा शुभांगी गोखले यांनी घर रिनोव्हेट करयाचं ठरवलं तेव्हा, त्यांनी ही आठवण आपल्यासोबत कायमस्वरुपी राहावी म्हणून दरवाजाच्या हा भाग कापून आपल्या घरी घेऊन आठवण म्हणून ठेवला. इतकंच नाही तर मोहन यांची लेक सखीने देखील या कवितेच्या ओळी टॅटूच्या स्वरूपात आपल्या शरीरावर गोंदवून घेतल्या.
सखी आपल्या बाबांची निधनांतरची आठवण सांगताना म्हणाली, 'बाबांनी घराच्या दारामागे कुसुमाग्रजांच्या ओळी लिहिल्या होत्या आणि त्यातल्या शेवटच्या ओळी त्यांच्या स्वत:च्या होत्या. घराचं रिनोवेशन झालं तेव्हा आईन तेवढा तुकडा कापून जपून ठेवला. त्यानंतर मी त्या ओळींचाच टॅटू केला.'
पुढे ती म्हणाली, ''माझे बाबा मला सोडून गेले, तो काळ मला स्पष्टपणे आठवतो. एक लहान मूल म्हणून त्यांचा मृत्यू हा मला गोंधळात टाकणारा होता. 'त्यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी सहा वर्षांच्या एका मुलीला सांगताना शुभांगी गोखले म्हणाल्या, ''आपल्यात वावरणारी काही माणसं ही परमेश्वराची मुलं असतात. ती खास आणि सुंदर असतात, त्यांना आपल्यासाठी एक भेट म्हणून देवाने पाठविलेलं असतं. पण देवालाच जेव्हा एकाकी वाटतं, तेव्हा तो या मुलांना आपल्याकडे बोलावून घेतो. कारण त्याला त्या मुलांचा सहवास हवा असतो, त्यामुळे अशा सुंदर मुलांचा जो काही थोडाफार सहवास आपल्याला लाभला, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला हवेत. आपण त्यांचं स्मरण करून त्यांचा सहवास साजरा केला पाहिजे."
वाचा: आलियाच्या बॉडीगार्डचं गैरवर्तन, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला...; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!
शेवटच्या काळात मोहन आशीर्वाद, अल्पविराम, जंजिरे या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत होते, ज्या चित्रपटाचा शूटिंग साठी ते मद्रासला गेले होते त्या हे राम चित्रपटाचे दिग्दर्शक कमल हसन यांनी मोहन यांच्या भूमिकेचे कौतुक करताना,'' मोहन गोखले यांनी अभ्यंकर ही भूमिका माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर साकारली होती'' , असे म्हटले होते. पुढे जाऊन मोहन गोखले यांची ती भूमिका अतुल कुलकर्णी यांनी त्यांची भूमिका केली होती ज्यासाठी त्याना नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला होता.