अभिनेते मकरंद अनासपुरे हे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहेत. मात्र एका खेड्यातून मुंबईत आलेल्या मकरंद यांना सिनेसृष्टीत आपला जम बसवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. त्यांचा अगदी चाळीतल्या भाड्याच्या रूमपासून ते फ्लॅटपर्यंतचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. मात्र या सगळ्यात त्यांना साथ लाभली ती त्यांची पत्नी शिल्पा यांची. शिल्पा आणि मकरंद यांनी २००१ साली लग्नगाठ बांधली. हे आंतरजातीय लग्न असूनही कोणाच्याच घरून विरोध झाला नव्हता. मात्र लग्नापूर्वी शिल्पाच्या वडिलांनी तू त्याच्यासोबत संसार करू शकणार नाहीस असे सांगितले होते. त्यांच्या असं म्हणण्यामागे नेमकं काय कारण होतं? जाणून घेऊया मकरंद आणि शिल्पा यांच्या प्यारवाली लव्हस्टोरी.
शिल्पा आणि मकरंद यांची पहिली भेट 'जाऊबाई जोरात' या नाटकाच्या तालिमींदरम्यान झाली होती. शिल्पा हौस म्हणून नाटकात काम करत होत्या. मात्र मकरंद यांचा साधेपणा आणि नाटकाविषयी प्रेम, तळमळ पाहून त्या प्रभावित झाल्या होत्या. ते दोघे एकमेकांना पसंत करत होते. ते दोघे एकमेकांना पसंत करत होते. मात्र मकरंद यांच्या घरी त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्यांनी ही गोष्ट त्यांचा नाटकातील मित्र अभिनेते मंगेश देसाई यांना सांगितली की आई बीडच्या मुलींची स्थळं आणत आहे. त्यावर मंगेश यांनी त्यांना थेट तू शिल्पसोबत लग्न कर असं सांगितलं. ते शिल्पाच्या नावाने मकरंद यांना चिडवू लागले. त्यानंतर ही गोष्ट मकरंद यांनी मनावर घेतली आणि ते शिल्पाच्या वडिलांना भेटायला गेले..
मकरंद यांच्या पत्नी शिल्पादेखील अभिनेत्री आहेत. त्यांची घरची परिस्थिती अतिशय चांगली होती. मात्र मकरंद यांच्याकडे तेव्हा राहायला घरही नव्हतं. मकरंद शिल्पाला मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ते त्यांच्या वडिलांशी बोलले. सगळं बोलणं झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील आपल्याच मुलीला म्हणाले, 'शिल्पा मुलगा खूप चांगला वाटला. तो तुला खूप सांभाळून घेईल. तू त्याला सांभाळून घेऊ शकणार नाहीस. फार फार तर तू दोन महिने त्याच्यासोबत राहशील. नंतर तू परत येशील. सुरुवातीला प्रेमापोटी तू म्हणशील की हा मी खुश आह, खुश आहे. पण नंतर तू त्याला म्हणशील की माझ्या घरी तर असं होतं, तसं होतं. त्याच्या डोक्याला ताप होईल. तुला हे जमणार नाही.''
मकरंद आणि शिल्पा यांनी कोणाचेही न ऐकता लग्न केले. मात्र त्यानंतर त्यांच्यात थोडेफार खटके उडू लागले. तू असा कसा बसतोस, असा कसा खातोस असं म्हणणाऱ्या शिल्पाला मकरंद म्हणायचे मी आधीपासून असाच खातो. असाच बसतो. मात्र असं असलं तरी त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.
वाचा: पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी
लग्न झाल्यावर मकरंद यांनी ठाण्यातील वर्तकनगरमध्ये खोली भाड्याने घेतली. आई- वडिलांकडे फ्लॅटमध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर छोट्याश्या खोलीत राहायला आली. त्यानंतर ४ महिन्यांनी मकरंद यांनी स्वतःचे घर घेण्यासाठी धडपड सुरू केली. त्यांच्याजवळ साठवलेले ५० हजार रुपये होते. मात्र कलाकार असल्याने आयटी रिटर्नची फाइल नव्हती. त्यामुळे त्यांना कोणतीही बँक पैसे देईना. तेव्हा मात्र त्यांच्या सासऱ्यांनी २ लाख ५ हजाराचा चेक त्यांना देऊ केला. स्वाभिमानी मकरंद यांनी तो चेक नाकारला. मात्र तेव्हा तुम्ही मला बँक समजा आणि हे सगळे पैसे व्याजासह मला परत करा असं शिल्पाचे वडील म्हणाले. त्यांनी तो चेक घेतला आणि पुन्हा खूप काम करून पैसे जमवून सासऱ्यांचे पैसे मकरंद यांनी परत केले.