‘शोले’ हा भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतचा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा मानला जातो. १९७५ साली म्हणजे आजपासून तब्बल पन्नास वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटाने त्यावेळी केवळ बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम प्रस्थापित केले नव्हते तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार, अमजद खान या ‘शोले’तील कलाकारांच्या केवळ भूमिकाच नव्हे तर संवादही फार गाजले होते. शिवाय या चित्रपटाचे संगीतही फार लोकप्रिय झाले होते. शोले चित्रपटासंदर्भात अनेक किस्से प्रसिद्ध असून सिनेरसिक आजही मोठ्या चवीने त्याची चर्चा करत असतात.
शोले चित्रपटासंदर्भात असाच एक किस्सा शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी नुकताच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. शोलेमध्ये सर्वाधिक गाजलेल्या भूमिकेपैकी एक म्हणजे खलनायक 'गब्बरसिंह'ची भूमिका होय. अभिनेता अमजद खान याने ही भूमिका वठवली होती. परंतु अमजद खानला गब्बरसिंहची भूमिका अनवधानाने मिळाली होती, अशी माहिती रमेश सिप्पी यांनी मुलाखतीत दिली आहे. शोले सिनेमाची पटकथा आणि संवाद सलीम-जावेद या जोडीने लिहिले होते. शोलेतील गब्बरसिंहचे पात्र लिहिताना सलीम-जावेद यांच्यासमोर त्यावेळी गाजलेला खलनायक डॅनी याची प्रतिमा होती. त्याच दरम्यान फिरोज खान दिग्दर्शित ‘धर्मात्मा’ या सिनेमासाठी डॅनी करारबद्ध झाला होता. ‘धर्मात्मा’मध्ये फिरोज खान यांच्या समवेत तुल्यबळ बरोबरीची भूमिका डॅनीला ऑफर करण्यात आली होती. तर शोलेमध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार आणि हेमामालिनी सारखे मोठमोठे स्टार होते. या मोठ्या स्टार्सच्या मांदियाळीत गब्बरसिंह या खलनायकाला पडद्यावर कितपत स्थान मिळेल, याबाबत डॅनीच्या मनात साशंकता होती. त्यामुळे शोले की धर्मात्मा यामध्ये डॅनीने धर्मात्माची निवड केली आणि तो धर्मात्माच्या शुटिंगसाठी अफगाणिस्ताना निघून गेला, असं सिप्पी म्हणाले.
इकडे शोलेच्या निर्मात्यांना मात्र लवकर चित्रकरण सुरू करायचे होते. डॅनी अफगाणिस्तानातून परत येईपर्यंत त्यांच्याकडे वेळ नव्हता. सलीम-जावेद जोडीने गब्बरसिंहच्या पात्राच्या तोंडी चांगले संवाद ठेवल्याने मुरब्बी कलाकाराच्या शोधात होते. त्याचदरम्यान शोलेचे पटकथा लेखक सलीम यांनी अभिनेता अमजद खान यांचे नाव सूचवले. आणि अशाप्रकारे त्यावेळी हिदी सिने इंडस्ट्रीत अगदी नवखे असलेले अभिनेता अमजद खान यांना शोलेतील गब्बरची भूमिका मिळाली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी गब्बरच्या भूमिकेचं कौतुक केलं, तेव्हा अगदी अमिताभ बच्चन पासून संजीव कुमार यांनी गब्बरसिंह ची भूमिका करायला आवडती असती, असं सांगितल्याचं रमेश सिप्पी यांनी सांगितलं.
दरम्यान, अभिनेता अमजद खान यांची भूमिका क्रूर आणि भारदस्त खलनायकाची होती. मात्र व्यक्तीरेखेला साजेसा आवाज मात्र नव्हता. अशावेळी अमजद खान यांचा आवाज डब करावा अशी सूचना सलिम-जावेद यांच्याकडून आली होती, असं रमेश सिप्पी म्हणाले. परंतु त्यांचा आवाज जसा आहे तसाच ठेवण्याचा निर्णय माझा होता आणि अखेर प्रेक्षकांना त्यांचा अस्सल आवाज पडद्यावर आवडला, अशी आठवण रमेश सिप्पी यांनी सांगितली.