सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते तयारी लागले असल्याचे चित्रपट दिसत आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. दरम्यान, मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाण हा राष्ट्रवादी गटाचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेला होता. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ आता 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील अभिनेता भाऊ कदम यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सुरज चव्हाण याच्याप्रमाणे अभिनेता भाऊ कदम देखील आता अजित पवार यांचा प्रचार करणार का याबाबत देखील चर्चा सुरू आहे.
भाऊ कदमने अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाऊ कदम हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता भाऊ कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘अजितदादांच्या पक्षाचा प्रचार करायला मला आवडेल, एकच दादा अजित दादा आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा स्टार प्रचारक व्हायला मला आवडेल. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे आणि त्यांनी आमचे कलाकारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत' असे भाऊ कदम म्हणाले आहेत.
अजित पवारांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर भाऊ कदम यांच्या भेटीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत, ‘आज प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुनील तटकरे, सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.
वाचा : सनी लिओनीने केले दुसऱ्यांदा लग्न, मुलांच्या साक्षीने घेतली शेवटपर्यंत साथ निभावण्याची शपथ
दरम्यान अजित पवार यांचा प्रचार करायला मला आवडेल, त्यांच्या पक्षाचा स्टार प्रचारक व्हायला मला आवडेल असं भाऊ कदम यांनी म्हलटं आहे. त्यामुळे आता लवकरच भाऊ कदम हे राष्ट्रवादीच्या स्टेजवर दिसण्याची शक्यता आहे.