Atul Parchure Cancer Treatment: मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते अतुल परचुरे यांनी त्यांच्या आयुष्यातील एका भीषण घटनेचा खुलासा नुकताच केला आहे. त्यांच्या मंचावरील प्रवेशाने नेहमीच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. पण नुकतेच या अभिनेत्याने स्वतःच्या तब्येतीबद्दल एक अपडेट दिले, जे ऐकल्यानंतर चाहते आता त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतित झाले आहेत. अतुल परचुरे हे टीव्ही तसंच चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव आहे. नुकतेच त्यांनी आपण कॅन्सरशी झुंज देत असल्याचा खुलासा केला आहे. याशिवाय चुकीचे उपचार केल्याने त्रास अधिक वाढला, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
अतुल परचुरे यांनी नुकताच त्यांच्या कर्करोगाविषयी खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी त्यांना या आजारपणबद्दल कसे कळले आणि आता त्यांची प्रकृती कशी आहे, हे सांगितले. सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. यावेळी अतुल परचुरे यांनी सांगितले की, माझ्या लग्नाचा २५वा वाढदिवस होता. तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेलो होतो. तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण काही दिवसांनी माझी जेवणावरची वासना उडू लागली. आवडीचे पदार्थही एकाएकी आवडेनासे झाले. त्यानंतर मला वाटलं काहीतरी चुकतंय. नंतर माझ्या भावाने मला काही औषधे दिली. पण, त्यांचा मला काहीच फायदा झाला नाही.’
पुढे अतुल परचुरे म्हणाले की, ‘अनेक डॉक्टरांना भेट दिल्यानंतर मला अल्ट्रासोनोग्राफी करण्यास सांगण्यात आले. जेव्हा डॉक्टरांनी हे केले तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात एक भीती दिसली आणि मला वाटले की काहीतरी चुकीचे घडले आहे. त्यावेळी मला सांगण्यात आले की, माझ्या यकृतामध्ये ५ सेमी लांबीची गाठ आहे आणि ती कर्करोगाची आहे. त्यावर मी त्याला विचारले की, मी ठीक होऊ शकेन की नाही? तेव्हा डॉक्टर म्हणाले की, हो तू ठीक होशील. तथापि, त्यादरम्यानचा उपचारांचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि माझी प्रकृती सतत खालावत गेली. त्याचवेळी शस्त्रक्रिया देखील लांबली.’
‘माझ्या पहिल्या उपचार प्रक्रियेत चूक झाली. याचा माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि मला अधिक त्रास होऊ लागला. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडली होती. मला चालताही येत नव्हते. बोलत असताना देखील मी थकून जायचो. अशा स्थितीत डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, जर आता शस्त्रक्रिया केली तर, मला दीर्घकाळ कावीळीचा सामना करावा लागेल आणि माझ्या यकृतात पाणी भरेल. यामुळे मी फारकाळ जगू शकणार नाही. पण, नंतर मी डॉक्टर बदलले, योग्य औषधे आणि केमोथेरपी घेतली’, असे देखील अतुल परचुरे म्हणाले.
संबंधित बातम्या