अभिनेते अतुल परचुरे यांनी आपल्या दमदार अभिनयाने मालिका, चित्रपट आणि रंगभूमी देखील गाजवली. गेल्या काही काळापासून आजारी असणारे अतुल परचुरे, एका गंभीर आजारावर मात करून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. कर्करोगासारख्या महाभयंकर आजारावर त्यांनी विजय मिळवला असून, आता ते पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार झाले आहेत. ‘झी नाट्य गौरव’ सोहळ्या दरम्यान अतुल परचुरे यांची खास उपस्थिती असणार आहे. या दरम्यान त्यांचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
‘झी नाट्य गौरव’च्या आठवणींच्या सेगमेंटमध्ये अतुल परचुरे यांनी त्यांच्या एका जुन्या नाटकाच्या दरम्यानचा एक गमतीशीर अनुभव सांगितला आहे. अतुल परचुरे हे झुरळांना प्रचंड घाबरतात. अशाच एका नाटकादरम्यान त्यांना झुरळांशी कशा प्रकारे सामना करावा लागला होता, याचा एक गमतीशीर किस्सा त्यांनी यावेळी प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. किस्सा सांगताना अतुल परचुरे म्हणाले की, ‘मला आठवतंय मी एका व्यावसायिक नाटकात काम करत होतो. त्यावेळी व्यावसायिक नाटकं करताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागायचं. अशाच एका वर्षी मी ‘नातीगोती’ नावाचे नाटक करत होतो. या नाटकाच्या निमित्ताने बाहेरगावी जावे आणि राहावे लागायचे.’
पुढे अतुल परचुरे म्हणाले की, ‘त्यावेळी नगर किंवा कुठेतरी असाच एक प्रयोग होता आणि तिथे ज्या थिएटरमध्ये हा प्रयोग पार पडणार होता, त्या थिएटरचा पडदा जवळपास तीन महिने उघडला गेला नव्हता. केवळ आमच्या नाटकासाठी या नाट्यगृहाचा पडदा उघडला गेला होता. तो पडदा उघडताच त्यातून अक्षरशः राणीची बाग भरेल, एवढे पशुपक्षी बाहेर आले होते. झुरळं, पाली, दास आणि इतर अनेक प्रकारचे किडे त्यातून बाहेर पडले. ते साफ करून आमचा प्रयोग सुरू झाला. त्या नाटकात स्वाती चिटणीस माझ्या आईची भूमिका करत होत्या. त्यांनी साडी कपाटातून काढली आणि नेसायला जाणार इतक्यात त्या साडीतून दोन मोठी झुरळं बाहेर आली. झुरळं बघतात स्वाती यांनी ती साडी फेकून दिली आणि त्या प्रयोगातूनच आतमध्ये विंगेत निघून गेल्या. त्या झुरळांबरोबर मी स्टेजवर काम करणार नाही’, असं त्यांनी थेट सांगितलं.
‘या नाटकात मी एका मतिमंद मुलाचं काम करत होतो. मी स्टेजवर बसलो होतो, सीन सुरू होता आणि अचानक ती झुरळ माझ्या दिशेने यायला लागली. मी झुरळांना भयंकर घाबरतो. तरीही त्यावेळी त्या मुलाच्या पात्रांचं बेरिंग सांभाळत, मी तर झुरळांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण, ती झुरळं काही हार मानत नव्हती. झुरळं पुढे येताच, मी देखील उठून आतमध्ये गेलो. त्यानंतर मग आमच्या एका बॅकस्टेजच्या माणसाने त्या झुरळांना मारलं आणि आमचा पुढचा प्रयोग सुरू झाला’, असे अतुल परचुरे म्हणाले. नाटक करताना खरंच असे वेगवेगळे प्रसंग समोर येत असतात आणि या प्रसंगांना तोंड देऊनच आपलं नाटक गाजवायचं असतं. जर, तुम्ही अशा प्रसंगांना तोंड देऊ शकलात, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकता, असं अतुल परचुरे म्हणतात.