Ajaz Khan Drugs Case : ‘बिग बॉस’ फेम आणि अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एजाजचे तसे वादांशी जुने नाते आहे. तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. एजाजनंतर आता त्याची पत्नी फॅलोन गुलीवाला ड्रग्ज प्रकरणात अडकली आहे. एजाज खानची पत्नी फॅलोन गुलीवाला हिला ड्रग्ज प्रकरणात कस्टम विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले आहे.
कस्टम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी जोगेश्वरीतील त्याच्या घरावर छापा टाकून विविध अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर गुलीवाला हिला गुरुवारी अटक करण्यात आली. ड्रग्ज तस्करी प्रकरणात तिचे नाव समोर आले होते. या आधी ८ ऑक्टोबर रोजी एजाज खानचा शिपाई सूरज गौर याला कुरियरद्वारे १०० ग्रॅम मेफेड्रोन किंवा एमडीएमए मागवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हे ड्रग्ज अंधेरीतील एका कार्यालयात पोहोचवले जाणार होते. हे ड्रग्ज एजाजच्या कार्यालयाचा पत्ता असलेल्या अंधेरीतील बी-२०७, ओबेरॉय चेंबर्स, वीरा देसाई औद्योगिक वसाहतीत पोहोचवले जाणार होते.
एजाज खानने गुरुवारी एका एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत लिहिले की, 'मित्रांनो, हीच युक्ती माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबासोबत परत परत केली जात आहे. यावेळी संपूर्ण कुटुंब टार्गेट आहे. हे मी उघडपणे सांगू शकत नाही, पण तुम्ही लोक समजूतदार आहात. आज पहिल्यांदाच मी खूप अस्वस्थ आणि नर्व्हस आहे. माझ्यासाठी नाही, तर माझ्या कुटुंबासाठी. मी बाहेर आहे आणि मला समजले आहे की, ते लवकरच मला त्रास देण्यासाठी माझ्या कुटुंबाला लक्ष्य करणार आहेत. मला माझ्या जिवाची १% ही पर्वा नाही. पण, मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतोय.'
याशिवाय नेहमी अशाप्रकारच्या खटल्यांमध्ये अडकलेल्या एजाज खानने गुरुवारी आपल्या एक्स अकाऊंटवर आणखी एक पोस्ट शेअर केली. 'खरं बोलणं गुन्हा आहे का? आता माझ्यापाठोपाठ माझ्या कुटुंबालाही टार्गेट केले जात आहे. प्रशासनाला काय हवे आहे? ते कोणत्या दबावाखाली आहेत का? सत्य बोलल्याबद्दल मला शिक्षा झाली नाही, पण नेहमी खोट्या खटल्यांमध्ये अडकवले गेले. आता माझ्या कुटुंबालाही टार्गेट केले जात आहे. मी नेहमीच सत्याच्या पाठीशी उभा राहिलो आहे. सत्य बोलण्याची हीच शिक्षा असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला अन्याय सहन करावा लागतो का? आता एजाज खान यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.