बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा रंगली आहे. अभिषेक हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आगामी प्रोजेक्टचे संकेत देत होता. आता त्याच्या 'आय वॉन्ट टु टॉक' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील अभिषेकच्या बदललेल्या शरीरयष्ठीचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार...
'आय वॉन्ट टु टॉक' या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन सिनेमामध्ये अभिषेक हा अर्जुनच्या भूमिकेत दिसणार आहे. या अर्जुनला बोलायला फार आवडते. त्याला एक आजार झाला आहे. या आजारामध्ये त्याचा आवाज गेला आहे. ट्रेलरमध्ये या अर्जुनच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच तो ट्रेलरमध्ये माफी मागताना देखील दिसत आहे. पण अभिषेक नेमकी माफी का मागत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता त्या मागचे रहस्य चित्रपट पाहिल्यावर समोर येणार आहे.
ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चन डॉक्टरांशी बोलताना दिसत आहे, जो त्याला सांगतो की त्याच्या घशावर शस्त्रक्रिया करावी लागेल. अर्जुनचा आजार बरा करण्यासाठी त्याने केलेला संघर्ष आणि कुटुंबाभोवती हा चित्रपट फिरताना दिसतो. ट्रेलरच्या शेवटी असे दाखवण्यात आले आहे की, जर कोणी अभिषेकला विचारले की जर त्याला जीवन परत मिळाले तर त्याला काय करायचे आहे. त्यानंतर तो लेखी सांगतो की त्याला बोलायचे आहे.
वाचा: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, 'या' हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम
सोशल मीडियावर 'आय वॉन्ट टु टॉक' या चित्रपटाचे कौतुक होत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होणार नाही पण त्याला सन्मानजनक पुरस्कार मिळेल." दुसऱ्या एका यूजरने, "अभिषेकचे ट्रान्सफॉर्मेशन, या ट्रेलमध्ये छान दिसत आहे" अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'या माणसाला विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, नात्यात अनेक चढ-उतार असतात जे कॉमन असतात. पण हा माणूस आगामी चित्रपटासाठी आमच्या प्रेमाला पात्र आहे. अनेक जण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत' असे म्हटले आहे.