देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत याने राधिका मर्चंटशी १२ जुलै रोजी लग्न केले. या लग्नाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. एकीकडे सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. तर दुसरीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला होता. अभिषेक आपल्या संपूर्ण कुटुंबासह लग्नात सहभागी झाला होता, तर ऐश्वर्या मुलगी आराध्या बच्चनसोबत एकटीच दिसली होती. या संपूर्ण लग्नात ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही. आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले आहे.
अभिषेकने सोशल मीडियावर एक पोस्ट लाईक केली आहे. या पोस्टमुळे अभिषेकच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावरील ती पोस्ट ही घटस्फोट आणि त्यानंतर होणारा त्रास यावर आधारित आहे. या पोस्टवर अभिषेकने प्रतिक्रिया दिलेली पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
एका पत्रकाराने घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. 'घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. सुखी कुटुंब कुणाला नको असतं? आपलं म्हातारपण आपल्या जोडीदारासोबत कुणाला घालवावेसे वाटत नाही? परंतु हे नेहमीच घडत नाही, केवळ आपल्याला हवे तसे नाही' असे त्या पोस्टमध्ये लिहिलेले आहे. ही पोस्ट अभिषेकने लाईक केली आहे. ते पाहून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. अभिषेकने ही पोस्ट लाईक केल्यानंतर त्या पत्रकाराने त्या पोस्टचा स्क्रीनशॉट पुन्हा शेअर केला. हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा : पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक कलाच! कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट व्हायरल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै २०२४ रोजी लग्न केले होते. या व्हीव्हीआयपी लग्नाला देश-विदेशातील सर्व बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्ससोबतच अनेक बिझनेसमन, राजकारणी आणि क्रीडा जगतातील अनेक नामवंत व्यक्तींनी आपल्या उपस्थितीने हा विवाहसोहळा पार पाडला. अशातच संपूर्ण बच्चन कुटुंबीयही या लग्नाला पोहोचले होते. या लग्नानंतरच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली. मात्र, अद्याप दोघांनीही आपल्या नात्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच ऐश्वर्याचा दीपिकासमोर रडतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या