Abhishek Bachchan Gets Emotional : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट नुकताच २२ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. शुजित सरकारच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. आत्तापर्यंत ज्यांनी कुणी हा चित्रपट पाहिला आहे, ते सगळेच अभिषेकच्या कामाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन याने अक्षरशः जीव ओतून काम केले आहे. नुकतेच अभिषेक बच्चन आणि दिग्दर्शक शूजित सरकार 'कौन बनेगा करोडपती सीझन १६' च्या मंचावर पोहोचले होते. यादरम्यान ज्युनियर बच्चनने त्याच्या चित्रपटासोबतच त्याची मुलगी आराध्याबद्दलही भावूक वक्तव्य केले.
गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या वैवाहिक नात्यामध्ये काहीही चांगले चालत नसल्याची बातमी सर्वत्र पसरत आहे. अभिषेक अनेक वेळा ऐश्वर्यासोबत न दिसल्यानंतर लोकांनी या बातम्यांवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे. मात्र, आतापर्यंत या जोडप्याने या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, सध्या अभिषेक बच्चन ऐश्वर्याचे नाव घेणे देखील टाळत आहे. नुकताच अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी आराध्याच्या वाढदिवस झाला. मात्र, या दिवशीही अभिषेकने कोणतीही पोस्ट शेअर केली नाही, तेव्हा लोकांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली.
एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात कटुता आली असताना, जेव्हा अभिषेकने 'कौन बनेगा करोडपती सीझन १६'च्या मंचावर आपल्या मुलीच्या नावाचा उल्लेख केला, तेव्हा सगळ्यांना वाटू लागले की, त्याच्यात आणि त्याच्या मुलीमध्ये सर्व काही ठीक आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या नवीन भागात, अभिषेक बच्चन त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाविषयी बोलताना दिसला आहे. त्याच्या या चित्रपटात सिंगल वडिलांचे त्याच्या मुलीसोबतचे विस्कळीत नाते दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना, अभिनेत्याने त्याचे वडील अमिताभ बच्चन यांना म्हटले की, तुम्ही या चित्रपटातील सगळ्या भावना समजू शकता, कारण तुम्ही एका मुलीचे वडील आहात.’
मुलगी आराध्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला की, ‘आराध्या माझी मुलगी आहे आणि शुजित दा यांना देखील दोन मुली आहेत. आपण सगळेच 'मुलींचे बाप' आहोत आणि आपल्याला या भावना खरंच मनापासून भावूक करू शकतात. मुलीचा बाप असणे ही सोपी गोष्ट नाही.’ अमिताभ बच्चन देखील शोच्या मंचावर आपला मुलगा अभिषेकचे कौतुक करताना दिसले.