मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लक्ष्याच्या लेकाचं रंगभूमीवर दणक्यात पदार्पण! ‘आज्जीबाई जोरात’मध्ये अभिनय बेर्डे दिसणार मुख्य भूमिकेत

लक्ष्याच्या लेकाचं रंगभूमीवर दणक्यात पदार्पण! ‘आज्जीबाई जोरात’मध्ये अभिनय बेर्डे दिसणार मुख्य भूमिकेत

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 04, 2024 12:52 PM IST

लवकरच अभिनय बेर्डे याचं पहिलं वहिलं मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आज्जीबाई जोरात!’ असं या नाटकाचं नाव असून, मनोरंजन विश्वातील पहिलं एआय महाबालनाट्य असणार आहे.

लक्ष्याच्या लेकाचं रंगभूमीवर दणक्यात पदार्पण! ‘आज्जीबाई जोरात’मध्ये अभिनय बेर्डे दिसणार मुख्य भूमिकेत
लक्ष्याच्या लेकाचं रंगभूमीवर दणक्यात पदार्पण! ‘आज्जीबाई जोरात’मध्ये अभिनय बेर्डे दिसणार मुख्य भूमिकेत

मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे देहरुपाने आपल्यात नसले, तरी त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून ते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीच नाहीतर, हिंदी सिनेसृष्टीही गाजवली होती. चित्रपट, नाटक अशा दोन्ही मंचावर त्यांनी आपलं हक्काचे स्थान निर्माण केलं होतं. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा देखील मनोरंजन विश्वात आला. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ती सध्या काय करते’ हा अभिनय बेर्डेचा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, आता अभिनय मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. लवकरच अभिनय बेर्डे याचं पहिलं वहिलं मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘आज्जीबाई जोरात!’ असं या नाटकाचं नाव असून, मनोरंजन विश्वातील पहिलं एआय महाबालनाट्य असणार आहे. लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी नुकतीच या नाटकाची घोषणा केली असून, प्रेक्षकांमध्ये या नाटकाविषयी आतुरता निर्माण झाली आहे. ३० एप्रिलपासून हे नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आज्जीबाई जोरात’ हे बालनाट्य असलं, तरी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच मनोरंजन करण्यात कुठेही कसर सोडणार नाहीये. लक्ष्याचा लेक आता रंगभूमीवर येतोय म्हटल्यावर चाहते देखील खुश झाले आहेत.

अभिनयचे चाहते झाले खुश!

अभिनयने आपल्या पहिल्या नाटकाविषयी पोस्ट लिहिताच आता चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनय बेर्डेनं या नाटकाचं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आई-बाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकत आहे. माझं पहिलं व्यवसायिक नाटक ‘आज्जीबाई जोरात!’ अभिनयच्या या पोस्टवर आता चाहते भरभरून कौतुक करत आहे.

पुष्कर श्रोत्रीने केलं कौतुक

तर, अभिनेता अभिनय बेर्डे याच्या या पोस्टवर अभिनेता पुष्कर श्रोत्री यानेही कमेंट केली आहे. ‘आपल्या वडिलांना अभिमान वाटेल असं काम करण्याची क्षमता असलेला फार प्रामाणिक व मेहनती मुलगा म्हणजे अभिनय’, असं म्हणत पुष्कर श्रोत्री यांनी अभिनय बेर्डेचं कौतुक केलं आहे. येत्या ३० एप्रिलपासून हे नवंकोरं मराठी नाटक रंगभूमीवर दाखल होणार असून, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.

WhatsApp channel