Happy Birthday Abhijeet Sawant: ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंत याने आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मात्र, बिग बॉस मराठीच्या घरात शांत दिसणाऱ्या या व्यक्तीचं वादांशी मोठं कनेक्शन आहे. अभिजीतने अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आज (७ ऑक्टोबर) अभिजीत सावंत त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. अभिजीत सावंतचा जन्म ७ ऑक्टोबर १९८१ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. त्याचं बालपण कोकणातच गेलं. इथून त्याचा संगीताकडे कल वाढला.
यानंतर तो मुंबईत आला. त्याने मुंबईच्या चेतना कॉलेजमधून कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतले. यानंतर तो संगीत क्षेत्राकडे वळला. २००४मध्ये, तो टीव्हीच्या लोकप्रिय सिंगिंग रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सीझनचा विजेता बनला. शो जिंकल्यानंतर तो खूप लोकप्रिय झाला होता. शोच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल २००५मध्ये त्याने त्याचा पहिला सोलो अल्बम 'आपका अभिजीत सावंत' रिलीज केला. त्याच वर्षी त्याने 'आशिक बनाया आपने' चित्रपटात पार्श्वगायन केले आणि 'मरजावां मिटजावां' हे प्रसिद्ध गाणे गायले.
अभिजीत सावंतचा 'जुनून' हा दुसरा सोलो अल्बम २००७मध्ये रिलीज झाला. या अल्बमच्या शीर्षक गीताने संपूर्ण भारतभर खळबळ उडवून दिली होती. 'जो जीता वही सुपरस्टार' या रिॲलिटी शोचा तो फर्स्ट रनरअप होता. 'एशियन आयडॉल' या स्पर्धेमध्ये अभिजीत तिसरा आला होता. या रिॲलिटी शोमध्ये दक्षिण आशियाई देशांतील अनेक गायकांनी सहभाग घेतला होता. असे असूनही त्याला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळू शकला नाही. २००९मध्ये 'लॉटरी' चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'तीस मार खान' या चित्रपटातही तो छोट्या भूमिकेत दिसला होता. मात्र, अभिनय क्षेत्रात देखील त्याची जादू फार चालली नाही.
अभिजीत सावंतने पत्नी शिल्पासोबत 'नच बलिये सीझन ४' या डान्सिंग रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. मात्र, लोकांच्या कमी मतांमुळे दोघांनाही बाहेर काढण्यात आले. त्याने 'इंडियन आयडॉल ५'चे सूत्रसंचालनही केले होते. या सगळ्यानंतर त्याने शिवसेनेत प्रवेश करत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. या दरम्यान त्याने युवासेनेच्या माध्यमातून तरुणांना पक्षाशी जोडण्यास सुरुवात केली. मात्र, यातही अभिजीतला यश मिळू शकले नाही.
अभिजीत सावंत याचं वादांशीही मोठं कनेक्शन आहे. २०१०मध्ये त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याने या वेळी सगळे आरोप झिडकारत आपण अपघातावेळी दारू प्यायली नसल्याचे म्हटले होते. काही काळापूर्वी त्याने 'इंडियन आयडॉल १२'चे निर्माते आणि परीक्षकांवर उगाच ड्रामा करून व्ह्यूज मिळवत असल्याचा आरोप केला होता. तो म्हणाला होता की, शोच्या टीआरपीसाठी निर्माते आणि परीक्षक या कार्यक्रमांमध्ये उगाच लव्ह स्टोरी घुसवण्याचा प्रयत्न करतात आणि विचित्र गोष्टी करतात. त्याने 'इंडियन आयडॉल ११' मधील होस्ट आदित्य नारायण आणि नेहा कक्कर यांच्या लग्नाच्या अँगललाही टीआरपी गेम म्हटले होते.