Abhijeet Bhattacharya And Shah Rukh Khan : प्रसिद्ध बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच, सुपरस्टार शाहरुख खानच्या 'बादशाह' चित्रपटातील 'वो लडकी' या लोकप्रिय ट्रॅकच्या चाहत्यांनी बनवलेल्या मॅशअपवर त्याने भडक प्रतिक्रिया दिल्याने गायक चांगलाच चर्चेत आला होता. आता नुकतेच त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून, आता हे प्रकरण मिटले असून दोघांमध्ये समेट झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच इंडस्ट्रीतील लोक शाहरुख खानला त्याच्या पाठीमागे 'हकला' म्हणायचे, असा खुलासाही अभिजीत भट्टाचार्य याने त्याच्या नव्या मुलाखतीत केला आहे.
अभिजीत भट्टाचार्य नुकतेच शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्टवर एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान अभिजीत भट्टाचार्य म्हणाला की, ९०च्या दशकांत एक अशी वेळ आली होती, जेव्हा तो खूपच निवडक गाणी गात होता. त्यावेळी त्याने अनेक गाणी गाण्यास थेट नकार देखील दिला होता. यावर बोलताना अभिजीत म्हणाला की, 'मी त्याकाळात खूपच निवडक झालो होतो. मी या बाबतीत खूप सावध झालो होतो. त्यावेळी मी ठरवले होते की, मी फक्त शाहरुख खानसाठी गाणी गाणार.'
अभिजीत भट्टाचार्य याने या मुलाखतीत पुढे सांगितले की, लोक त्याकाळी शाहरुखला 'हकला' म्हणजेच 'तोतरा' म्हणत असत. एक किस्सा सांगताना तो म्हणाला की, 'मला शाहरुख खानसाठी गायलेल्या एका गाण्यासाठी पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार घेऊन स्टेजवरून खाली उतरत असताना एक मोठा कलाकार माझ्यासमोर आला आणि म्हणाला की, त्या तोतऱ्यासाठी गाणी गातोस ना तू? त्यानंतर आणखी एक-दोन लोक हेच वाक्य म्हणाले. मलाही त्यावेळी खूप विचित्र वाटलं.'
अभिजीत भट्टाचार्य म्हणाला की, 'मला त्यावेळी हे ऐकून धक्काच बसला होता. मला आश्चर्य वाटत होतं, की त्यांना शाहरुख खानचा इतका हेवा का वाटत आहे. माझ्या गाण्यासाठी मला पुरस्कार मिळाला होता. पण, यानंतर माझा पार्श्वगायनातील रस कमी होऊ लागला. मी अभिनेत्यांसाठी गाणी गाणे बंद केले. त्यानंतर मी माझ्या शो आणि गाण्याच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करू लागलो. यातून मला आनंद मिळू लागला.'
संबंधित बातम्या