कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. २४ वर्षांपूर्वी दोन अनोळखी मुलींचे नशीब एका रात्रीत बदलले होते. एक नर्स या अदलाबदलीला कारणीभूत असते. पण आता हे सत्य समोर आले आहे. गायकवाडांचे घर हेच आपले हक्काचे घर आहे हे अखेर श्रीसमोर येणार आहे. आजच्या या विशेष भागात प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
नर्समुळे गरीब घरातील शुभ्रा श्रीमंत घरात जाते तर श्रीमंत घरातील श्री गरीब घरात लहानाची मोठी होते. पण या सगळ्याला कारणीभूत असणारी नर्स श्रीला आता तिचा हक्क आणि तिच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल सांगणार आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून श्रीला मोठे धक्के मिळत आहेत. पण स्वत:ची खरी ओळख सांगणारा हा मोठा धक्का श्री पचवू शकेल का? तिला हे सगळं सत्य आहे हे पटेल का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा विशेष भाग जरुर पाहावा लागणार आहे.
'अबीर गुलाल' मालिकेत आलेल्या सध्याच्या ट्विस्टबद्दल श्रीला काय वाटते हे तिने सांगितले आहे. ती म्हणाली, "मी जर माझा खरा हक्क मागितला तर गायकवाड आई, बाबा आणि घर सगळं मिळेल. पण शुभ्रा मॅडमचं अख्ख आयुष्यचं उद्धवस्त होऊन जाईल. शुभ्रा मॅडमच्या साखरपुड्यात कोणतंही विघ्न यायला नको. पण हे सगळं खरं ऐकून काही वेगळचं घडलं तर."
वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते माहिती आहे का?
श्री पुढे म्हणतेय,"माझ्यामुळे आधीच सगळ्यांना खूप त्रास झाला आहे. आई अंबाबाई कसली परीक्षा घेत आहेस? म्हणजे आयुष्यभर ज्यांची वाट पाहिली, ज्या गोष्टीसाठी मी तडफडत राहिले ते सगळं सुख, आनंद तू असा माझ्यासमोर मांडून ठेवला आहेस. पण हे सगळ्यांना कळल्यानंतर मला सगळे आपलं मानतील का? मला आपलं करुन शुभ्रा मॅडमला त्यांनी दूर केलं तर?" या सगळ्या प्रश्नांमध्ये गोंधळलेल्या श्रीचं पुढचं पाऊल काय असेल हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 'अबीर गुलाल' मालिकेचा विशेष भाग प्रेक्षकांना आज रात्री पाहायला मिळणार आहे.