काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी ऑल राउंडर अब्दुल रझाकने एका टीव्ही शोमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कामगिरीबाबत बोलताना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल घाणेरडे वक्तव्य केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर अब्दुलवर जोरदार टीका झाल्याचे पाहायला मिळाले. आता अब्दुलने या प्रकरणी जाहिर माफी मागितली आहे.
अब्दुलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसत आहे की, "मी अब्दुल रझाक आहे... काल पत्रकार परिषदेदरम्यान, आम्ही क्रिकेट कोचिंग आणि PCB चा हेतू यावर चर्चा करत होतो. त्यावेळी बोलताना माझी जीभ घसरली आणि चुकून ऐश्वर्या रायचे नाव घेतले. मी तिची वैयक्तिक माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला दुसरे उदाहरण द्यायचे होते, पण चुकून तिचे नाव वापरले.” सध्या सोशल मीडियावर अब्दुलचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: सलमान खानचा 'टायगर ३' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या हेतूबद्दल रझाक बोलत होता. 'संघानं चांगली कामगिरी करावी असं वाटत असेल तर तुमचा तसा हेतू असला पाहिजे. तुम्ही म्हणाल की ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न करून मी आदर्श मुलं जन्माला घालीन, तर तसं अजिबात शक्य नाही. तुम्हाला तुमचं ध्येय आधी ठरवावं लागेल आणि हेतू प्रामाणिक असावा लागेल, असं रझाक म्हणाला.
रझाकच्या या टिप्पणीवर शोमध्ये उपस्थित असलेले शाहिद आफ्रिदी, उमर गुल हे क्रिकेटपटू फिदीफिदी हसताना दिसले. पाकिस्तानी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना मात्र रझाकचे हे वक्तव्य मात्र अजिबात आवडले नाही. सर्वच चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडिमार केला आहे. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग पाकिस्तानी क्रिकेटपटूंना जी वागणूक देतात ती योग्यच आहे, असं एका युजरने म्हटले होते.