Aattam Movie: नुकतीच ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये यंदा मराठी आणी बॉलिवूडसह साऊथच्या चित्रपटांचीही जोरदार चर्चा पाहायला मिळाली आहे. गेल्या काही काळात साऊथच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यात आता एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘अट्टम’. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एकर्षी यांनी केलं आहे. या चित्रपटाला ‘बेस्ट फिचर फिल्म’चा पुरस्कार मिळाला आहे. सध्या सगळीकडेच ‘अट्टम’ची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला आणखी दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘बेस्ट एडिटिंग’साठी महेश भुवनेन्द्र आणि ‘बेस्ट स्क्रीन प्ले फॉर मल्याळम फिल्म’साठी आनंद एकर्षी यांना देखील पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामुळे आता या चित्रपटात काय वेगळं आहे, हे जाणून घेण्यासाठीची सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ओटीटीवर देखील रिलीज झाला आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटाची कथा नक्की काय आहे...
‘अट्टम’ या मल्याळी शब्दाचा इंग्रजी अर्थ ‘द प्ले’ असा होतो. आनंद एकर्षी यांचा हा चित्रपट २०२३मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला आहे. ‘अट्टम’ हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटाची कथा हॉलिवूड चित्रपट ‘ट्वेलव्ह अँग्री मॅन’वर आधारित आहे. ही कथा एका अशा थिएटर ग्रुपची आहे, ज्यात एकूण १२ सदस्य आहेत. विशेष म्हणजे या थिएटर ग्रुपमध्ये ११ पुरुष आणि १ महिला आहे. हीच तरुण महिला सदस्य एका प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करते आणि या चित्रपटाची कथा सुरू होते.
आपल्या थिएटर ग्रुपमधील एकमेव महिला सदस्य जेव्हा असा मोठा आरोप करते, तेव्हा या गटातील ११ पुरुष सदस्य चांगलेच गोंधळात पडतात. अंजलीही या सगळ्यांमध्ये एकटी महिला आहे. या थिएटर ग्रुपमध्ये तिचे सगळेच सहकारी खूप चांगले आहेत. यातील विनय नावाचा सदस्य तिला खूप आवडतो. या थिएटर ग्रुपमध्ये खूप काही सुरू आहे. यात अहंकार आणि राजकारणाची लढाई देखील सुरू आहे. तरीही आपल्या सहकारी महिलेला न्याय मिळावा म्हणून सगळे ११ सदस्य कसोशीने लढत आहेत. एका पार्टीत अशी एक घटना घडते, ज्यामध्ये अंजली एका प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करते. तेव्हा ११ पुरुष सदस्यांमध्ये चांगलेच वैचारिक मतभेद सुरू होतात. याचं कथानक काहीसं अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘पिंक’सारखं आहे.
‘अट्टम’ची कथा जसजशी पुढे सरकते, तसतसे नाटक मंडळातील प्रत्येक सदस्याचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसू लागते. आनंद एकर्षी यांनी कथा अशा प्रकारे विणली आहे की, प्रेक्षक प्रत्येक पात्रावर प्रश्न उपस्थित करू लागतात. या गटातील बहुतेक लोक असे आहेत, जे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर वेगवेगळ्या नोकऱ्या करतात. कारण, रंगमंच त्यांचे पोट भरू शकत नाही. अंजलीची व्यक्तिरेखा स्वतः आर्किटेक्ट आहे. विनय हा पार्ट टाईम शेफ आहे. या ११ लोकांपैकी एक गॅस एजन्सीमध्ये काम करतो. इतर लोक प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन म्हणून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यापैकी एक वृत्तपत्राचे माजी संपादकही आहेत. या सर्वांची आर्थिक परिस्थितीही कथेतील महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. हा चित्रपट एका मोठ्या गुन्ह्याचा गांभीर्याने वेध घेतो. अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा करण्यावर भर द्यायला हवा, यावरही या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.
‘अट्टम’ या मल्याळम चित्रपटात झरीन शिहाब आणि विनय फोर्टे यांच्यासोबत कलाभवन शाजोहन, अजी थिरुवमकुलम, जॉली अँटोनी, मदन बाबू, नंदन उन्नी, प्रशांत माधवन, सनोश मुरली, संतोष पिरावोम, सेल्वराज राघवन, सिजिन सिजेश आणि सुधीर बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर बघू शकता.