Aarya Ambekar Challenge To Fans: आपल्या गाण्याने, सुमधुर आवाजाने आणि तितक्याच दमदार अभिनयाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी आर्या आंबेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्टेड असते. मात्र, आता आर्य आंबेकर हिने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने तिचा हा निर्णय जाहीर देखील केला आहे. इतकंच नाही तर, तिने चाहत्यांना देखील हे चॅलेंज दिलं आहे. मात्र, तिच्या या निर्णयामुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत आपण ब्रेक घेत असल्याचं म्हटलं आहे.
‘सारेगमप’ या लोकप्रिय कार्यक्रमातून आर्या आंबेकर घराघरांत पोहोचली. आर्याने आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटगीत आणि मालिकांची शीर्षकगीते गायली आहेत. आर्या आंबेकर गायिका असण्याबरोबरच एक चांगली अभिनेत्रीदेखील आहे. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आर्याचा अभिनय देखील पाहायला मिळाला होता. आर्या आंबेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. सोशल मीडियावर देखील तिने मोठा चाहता वर्ग जमवला होता. तिच्या पोस्ट आणि फोटोंना सोशल मीडियावर तुफान लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. मात्र, आता तिच्या एका पोस्टने सगळ्यांनाच धक्का दिला आहे.
आर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘मला तुम्हा सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. बघता बघता डिसेंबर महिना सुरू झाला आणि नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे ३१ दिवस राहिले आहेत. या काही काळासाठी मी स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवणार आहे आणि इतर काही गोष्टींना प्राधान्य देणार आहे. आपल्या आयुष्यात सतत डिजिटल गोंधळ सुरू असतो. त्या ऐवजी हे ३१ दिवस मन:शांतीसाठी आणि ध्येयाकडे लक्ष देण्यासाठी देऊया. त्याचबरोबर एक चांगली व्यक्ती होण्यासाठी वेळ देऊया. तुम्हीही माझ्याबरोबर हे आव्हान स्वीकाराल का?’
यापुढे आर्या आंबेकरने लिहिले की, 'नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त ३१ दिवस बाकी आहेत!! हा वेळ आपण सोशल मीडियापासून थोडं दूर राहून, स्वतःला आणि आपल्या मेंटल हेल्थला देऊयात का?! आपली व्यक्तिगत ध्येय, मूल्य या सगळ्यांवर पुन्हा विचार करण्यासाठी हा वेळ घेऊया!!'. तिच्या या पोस्टवर आता चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत.