दीर्घ प्रतीक्षेनंतर बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टशनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान याचा पहिला चित्रपट 'महाराज' अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या मुलाचा हा डेब्यू चित्रपट आहे, जो रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला होता. याआधी निर्माते हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित करणार होते. परंतु, वादांमुळे त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण गुजरात उच्च न्यायालयात पोहोचले होते. आता आठवडाभरानंतर न्यायालयाने चित्रपटाला मंजुरी देऊन निर्मात्यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाचा निकाल लागताच निर्मात्यांनी अजिबात वेळ न घालवता २१ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'महाराज' रिलीज केला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटाची कथा १८६२च्या महाराज लिबल केसवर आधारित आहे. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. या चित्रपटामुळे हिंदू पंथाच्या अनुयायांविरुद्ध हिंसाचार भडकू शकतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाबद्दल बराच गदारोळ झाला होता आणि त्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. याचिकेत दावा करण्यात आला होता की, वाढता वाद पाहता निर्मात्यांनी 'महाराज'चा ट्रेलर गुपचूप रिलीज केला आहे. असेच चित्रपट बनत राहिले, तर हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संगीता विषेन यांच्या खंडपीठाने 'महाराज' चित्रपट पाहिल्यानंतर हा निकाल दिला आहे. त्यांनी तो चित्रपट पाहिला, ज्यामध्ये त्यांना काहीही वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह आढळले नाही, असे खंडपीठाचे म्हणणे आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, हा चित्रपट निश्चितच मानहानीच्या खटल्यावर बनवला गेला आहे. पण, त्यामुळे कोणत्याही प्रकारे समाजाच्या भावना दुखावल्या जात नाहीयत. कोर्टाकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर 'महाराज' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
‘महाराज’ चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सने केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी केले आहे. ‘महाराज’मध्ये जुनैद खानसोबत जयदीप अहलावत आणि शालिनी पांडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याच्यासोबत या चित्रपटात ‘मुंज्या’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघचाही समावेश आहे. ‘महाराज’ हा चित्रपट एका वास्तविक कथेवर आधारित आहे. १८६२च्या ऐतिहासिक मानहानीच्या खटल्यावर आधारित सौरभ शाह यांच्या ‘महाराज’ या पुस्तकाचे हे रूपांतर आहे.