बॉलिवूडमधील परफेक्ट कपल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या आमिर खान आणि किरण रावने घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला. मात्र, घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण हे एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल लाईफ, दोघेही नेहमीच एकमेकांसोबत असतात. घटस्फोटानंतर त्यांचा 'लापता लेडीज' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता एका मुलाखतीमध्ये आमिरने या चित्रपटाच्या यशाचे श्रेय किरण रावला दिले आहे. इतकंच नाही तर आमिरने असंही सांगितलं की, 'आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.'
आमिर खानने नुकताच बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, "किरण माझ्या आयुष्यात आली आणि आम्ही सुंदर १६ वर्षे एकत्र घालावली. याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान मानतो आणि किरणचे आभार मानू इच्छितो. तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. ती एक चांगली व्यक्ती आहे आणि आता एक उत्तम दिग्दर्शिका."
'लापता लेडीज' या चित्रपटासाठी आमिरने दिग्दर्शक म्हणून किरण रावची निवड का केली असा प्रश्न आमिरला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर त्याने, 'कारण, कथानक मांडण्याची तिची शैली अतिशय सुंदर आणि खरी असते. जेव्हा मी पटकथा वाचली तेव्हा माझ्या मनात पहिले नाव किरण होते कारण ती एक सच्ची दिग्दर्शक आहे आणि ही एक अतिशय उत्तम कथा मांडणारी दिग्दर्शिका. मला असा दिग्दर्शक हवा होता जो ही कथा सत्यासह सांगू शकेल' असे उत्तर दिले.
आमिरने या मुलाखतीमध्ये पुढे त्यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. 'यात काही लपून राहिलेले नाही. ती खूप चांगली व्यक्ती आहे आणि मी ही फार वाईट नाही, त्यामुळे आमचं नातं चांगलं गेलं. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमचं नातं थोडं बदललं आहे, पण याचा अर्थ असा नाही की आमचा एकमेकांबद्दल विचार करण्याची पद्धत बदलली आहे.' चित्रपट शूट करताना दोघांमध्ये भांडण झाले होते का असा प्रश्न देखील आमिरला विचारण्यात आला होता. त्यावर आमिर म्हणाला, होय, अनेकदा. लढाईशिवाय आपण चित्रपट बनवू शकत नाही. जिथे आपलं म्हणणं मांडायचं आहे, ते आम्ही पाळतो.'
वाचा: चारित्र्यावर संशय घेण्याच्या रविंद्र महाजनी यांच्या स्वभावामुळे पत्नीने नोकरी करणे टाळले
आमिर खान आणि किरण राव यांनी १६ वर्षे एकत्र संसार केला. पण २०२१मध्ये त्यांनी घटस्फोट दिला. दोघांना आझाद राव खान मुलगा आहे. आता ते दोघेही वेगळे झाले असले तरी त्यांच्यामध्ये मैत्रिचे नाते आहे.