बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्याची माजी पत्नी रीना दत्ता यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभिनेत्याला ही दु:खद बातमी कळताच तो तातडीने आपल्या माजी पत्नीच्या घरी पोहोचला. दरम्यान,त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे,ज्यामध्ये आमिर खान साध्या कपड्यांमध्ये रीना दत्ताच्या मुंबईतील घरातून बाहेर पडताना दिसला आहे. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आमिरच्या आधी त्याची आई झीनत हुसैन यांनीही रीना दत्ताच्या घरी पोहोचून कठीण प्रसंगात तिचे सांत्वन केल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,आमिर खानचे सासरे आणि माजी पत्नी रीना दत्ताच्या वडिलांनी बुधवार,२ ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला. मात्र,त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही दु:खद बातमी आमिर खानला समजताच अभिनेता तात्काळ रीना दत्ताच्या घरी रवाना झाला. त्याने आपल्या सासऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. आजोबांच्या निधनामुळे आयरा खान आणि जुनैद खान यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि त्याची आई झीनत हुसैन हे देखील दु:खात दिसले.
रीना दत्ता ही सुपरस्टार आमिर खानची पहिली पत्नी होती. या दोघांनी १९८६मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर दोघांना दोन मुलं झाली. त्यांची मुलगी आयरा खान आणि मुलगा जुनैद खान हे दोघेही प्रसिद्धी झोतात असतात. जुनैद खानने काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. त्यांचा'महाराजा'हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. मात्र,आयराने स्वतःला अभिनयापासून अंतर ठेवले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न केले.
आमिर खान आणि रीना दत्ता यांचे लग्न फार काळ टिकले नाही. दोघांनी २००२मध्ये परस्पर संमतीने एकमेकांपासून घटस्फोट घेतला. विभक्त होऊनही दोघेही कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. घटस्फोटानंतर काही वर्षांनी आमिर खानने २००५मध्ये किरण रावशी लग्न केले. मात्र,त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही. २०२१मध्ये दोघेही वेगळे झाले आणि घटस्फोट घेतला. तर, घटस्फोटानंतरही त्यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. त्यांचा मुलगा आझादचीही ते एकत्र मिळून काळजी घेत आहेत.