Aamir Khan Post On Suhani Bhatnagar Death: 'दंगल' या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटात छोट्या बबिता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागर हिने आज (१७ फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. सुहानी भटनागर हिच्या निधनाच्या बातमीने तिचा ऑनस्क्रीन बाबा अर्थात बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याला देखील मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून सुहानी भटनागर हिला श्रद्धांजली वाहिली आहे. आमिर खान याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुहानीसाठी पोस्ट लिहिली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करताना अभिनेता आमिर खान याने लिहिले की, 'सुहानीच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले. तिची आई पूजा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखात आम्ही सामील आहोत... इतकी प्रतिभावान तरुण मुलगी, एक चांगली टीम प्लेयर... ‘दंगल’ सुहानीशिवाय अधुराच वाटला असता. सुहानी, तू कायम आमच्या हृदयात एक स्टार बनून राहशील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.’ या पोस्टमधून आमिर खान देखील भावूक झाल्याचे दिसत आहे. तो देखील प्रचंड दुःखी झाला आहे.
अभिनेत्री सुहानी भटनागरच्या मृत्यूने तिच्या कुटुंबासह बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या ऑनस्क्रीन मुलीच्या निधनाची बातमी ऐकून आमिर खान देखील कोलमडून गेला आहे. २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सुहानी भटनागर हिने छोट्या बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सुहानी चांगलीच लोकप्रिय झाली होती. चाहत्यांनीही तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले होते. मात्र, ‘दंगल’ या चित्रपटानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर गेली. या दरम्यान तिने आपले शिक्षण पूर्ण केले. चाहते तिच्या कमबॅकची वाट बघत होते. मात्र, सुहानीच्या अकाली निधनामुळे आता सगळेच दुःखी झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सुहानी भटनागर हिचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. या उपचारादरम्यान सुहानी काही औषधे घेत होती. मात्र, औषधाच्या दुष्परिणामांमुळे सुहानी भटनागरच्या शरीरात हळूहळू पाणी साठू लागले. यामुळे तिची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यानच तिने अखेरचा श्वास घेतला. शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी सुहानी भटनागर हिने जगाचा निरोप घेतला.