Sitaare Zameen Par Announcement: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अभिनेता आमिर खान याने नुकतीच त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या मोठ्या घोषणेसोबतच त्याने चित्रपटाचे कथानक काय असणार आहे, याची हिंट प्रेक्षकांना दिली आहे. ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट लोकांमध्ये असलेल्या कमजोरींवर भाष्य करणार आहे. या आधी आलेला त्याचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट देखील लहान मुलांमध्ये असलेल्या समस्यांवर भाष्य करणारा होता.
नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खान याने ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. आपण लवकरच या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात करणार असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. त्याचा हा आगामी चित्रपट २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात त्याने एका लहान मुलाला त्याच्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. मात्र, आता आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’मध्ये ९ लहान मुलं त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असताना देखील त्याला मदत करताना दिसणार आहे. या चित्रपटात देखील एक नवं भावविश्व उलगडलं जाणार आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना आमिर खान म्हणाला की, ‘मी आता याविषयी जास्त काही बोलू शकणार नाही. पण हा मी या चित्रपटाचे शीर्षक काय असणार हे नक्कीच सांगू शकतो. ‘सितारे जमीन पर’ हे या चित्रपटाचे शीर्षक असणार आहे. 'तारे जमीन पर' हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. आता या चित्रपटाचे नावही त्याच्याशी मिळते जुळते असणार आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये ही थीम आता आणखी १० पावले पुढे जाणार आहे. ‘तारे जमीन पर’ची थीम भावनात्मक होती, पण आता हा चित्रपट तुम्हाला हसवणार आहे. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले होते, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल. मागच्या चित्रपटात मी इशान नावाच्या मुलाला मदत केली होती. मात्र, आता ९ मुले मला मदत करणार आहेत.’
‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने २०२२मध्ये अभिनय करिअरमधून ब्रेक घेतला होता. मात्र, तो निर्मिती क्षेत्रात सक्रिय झाला होता. आता तो सनी देओलच्या एका आगामी चित्रपटावर काम करत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.