सध्या मालिका विश्वामध्ये नवनव्या मालिका सुरु होताना दिसत आहेत. या मालिकांचे विषय हे अतिशय वेगळे असल्याचे प्रेक्षकांना जाणवत आहे. आता दोन पौराणिक मालिका एकाच वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या दोन नव्या मालिका कोणत्या आहेत? कुठे पाहायला मिळणार? कधी प्रदर्शित होणार? हे जाणून घेऊया सविस्तर...
विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.
साडेतीन शक्तिपीठांचा महिमा जाणून घेण्यासाठी मुळात त्यांची निर्मिती कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच शक्तिरूप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात होईल. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर तो स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. देवयानी या मालिकेत देवदत्त याने साकारलेल्या सम्राटराव विखे-पाटील या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. देवयानीनंतर तो पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत जोडला जातोय.
वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, ते कपडे बदलताना पाहायचे; अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा
आई तुळजाभवानीचा उदो उदो... कलर्स मराठी वाहिनीवर 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणार, दुर्जनांच्या नाशासाठी अष्टभुजा 'आई तुळजाभवानी' प्रकटणार. 'आई तुळजाभवानी' मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘आई तुळजाभवानी'च्या रुपात कोण दिसणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच मालिकेत कोणते कलाकारा दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रेक्षकांमध्ये या दोन्ही मालिकांविषयी उत्सुकता वाढली आहे.