Aai Kuthe Kay Karte Latest Update: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या प्रेमाचा बहर आलेला पाहायला मिळत आहे. या मालिकेत नुकताच अरुंधती आणि आशुतोष यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला. यानंतर आता आशुतोष आणि अरुंधतीचा संसार बहरताना दिसणार आहे. अरुंधती आता लग्न करून केळकरांच्या घरात सून म्हणून आली आहे. यानंतर आता प्रेक्षकांना एक पॉझिटिव्ह ट्रॅक पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या प्रोमोमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांचा संसार बहरताना दिसत आहे. लग्नानंतर अरुंधती आणि आशुतोष पहिल्यांदाच एकमेकांसाठी नाश्ता बनवताना दिसणार असून, यावेळी आशुतोष सगळे अरुंधतीच्या आवडीचे पदार्थ बनवणार आहे. यावेळी आशुतोष अरुंधतीला अगदी राणीसारखी वागणूक देणार आहे. अरुंधतीच्या आवडीनिवडी जपणं आणि तिची काळजी घेण्याचं काम आता आशुतोष चोख पार पाडणार आहे. इतरांना काय आवडतं यापेक्षा अरुंधतीला काय आवडतं याचा विचार आशुतोष करणार असून, आता प्रेक्षकांना मालिकेत प्रेम पाहायला मिळणार आहे.
एकीकडे अरुंधती आणि आशुतोष यांचा संसार फुलणार आहे. तर, दुसरीकडे मात्र अनिरुद्ध आणि संजना यांच्या नात्यात वाद सुरू होणार आहेत. अनिरुद्ध स्वतःची तुलना आशुतोषसोबत करत आहे. तर, आशुतोष आणि तू या दोघांचा जवळपासही संबंध नाही, असं म्हणत संजना त्याला बोल लगावते. यावरून दोघांमध्ये कडाक्याची भांडणं सुरू झाली आहेत. याआधी देखील दोघांमध्ये वाद होतेच. मात्र, आता हे वाद टोकाला पोहोचणार आहेत. संजना आणि अनिरुद्ध यांनी आधीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मालिकेच्या येत्या भागांमध्ये दोघांचा घटस्फोट पाहायला मिळू शकतो.