
१९ सप्टेंबर रोजी देशभरात गणपती बाप्पाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले आहे. अनेक कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. काही मालिकांच्या सेटवरदेखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या सेटवर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सेटवरील बाप्पाची झलक दाखवली आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन होते. यंदाचे चौथे वर्ष आहे. सेटवरचा आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ मिलिंद गवळी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, 'आमच्या "आई कुठे काय करते" या स्टार प्रवाह वरच्या मालिकेच्या सेटवरच्या गणपती बाप्पाचे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झाले आहे. आमच्या मालिकेचे सर्वेसर्वा राजन जी शाही, यांच्या हस्ते पूजा करून गणपती बाप्पाची स्थापना केली. आमच्या मालिकेच्या बरेच कलाकार आणि तंत्रज्ञांच्या घरी गणपती बाप्पाचा आगमन होत असते त्यामुळे आम्हाला जरा जास्तीच्या सुट्ट्या हव्या होत्या. पण त्यामुळे सगळ्याना जरा एक्स्ट्रा तास कामही करावे, पण पण आमच्या आर्ट डिपार्टमेंटनी त्याहून एक्स्ट्रा काम केले आणि हा सुंदरसा गणपतीचा देखावा तयार केला. चंद्रयान तीनचे बॅकग्राउंड फारच गोड तयार केले. हा आमचा डी के पी कंपनीचा गणपती बाप्पा, जो आम्ही ठाण्यामध्ये बसवतो, त्याच्या व्यतिरिक्त डी के पी चे अजून तीन गणपती बाप्पा प्रत्येक त्यांच्या मालिकेच्या सेटवर बसतात.'
वाचा: हनीमूनला गेलेल्या अरुंधती आणि आशुतोषच्या कारचा होणार भीषण अपघात
पुढे तो म्हणाला, ''अनुपमाच्या' सेटवर', 'ये रिश्ता क्या कहलाता है' त्या सेटवर आणि BKAS त्या सेट गणपती बसतात, ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत तर गेली पंधरा वर्षे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, आणि 'आई कुठे काय करते' या मालिकेचा आता चौथं वर्ष आहे. आणि माझं भाग्य की चारी वर्ष मला गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पाच्या पूजेचा लाभ मिळाला. आमचे दाजी खूप श्रद्धेने आणि प्रेमाने पूजाअर्चा ,होम हवन करत असतात. आणि त्यामुळे एक वेगळंच चैतन्य आमच्या सेटवर निर्माण होतं. कुठल्याही यशाच्या मागे एक दिव्यशक्ती असते याची प्रचिती नेहमी होते. तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवो हीच बाप्पाकडे सदिच्छा.'
सध्या सोशल मीडियावर मिलिंदची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट करत 'आई कुठे काय करते' मालिकेच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित बातम्या
