Aai Kuthe Kay Karte Fans Angry:‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आधी टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल असणारी ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टॉप ५च्या शर्यतीतून देखील बाहेर पडली होती. मात्र, सततचा उतार झाल्यानंतर आता मालिकेच्या कथानकाने एक अनपेक्षित वळण घेतले आहे. मात्र, मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही. ‘आई कुठे काय करते’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. कमेंट्सच्या माध्यामतून प्रेक्षकांनी आता आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नात्यांची चांगलीच गुंतागुंत पाहायला मिळत आहे. एकीकडे अरुंधती आशुतोष केळकरसोबत लग्न करून त्याच्या घरी राहायला गेली असली, तरी तिचं सगळं लक्ष मात्र देशमुख कुटुंबाकडे लागून राहिले आहे. देशमुख कुटुंबात तिचा सततचा वावर आहे. तिथे आशुतोषच्या आयुष्यात माया नावाची नवी व्यक्ती एन्ट्री करू पाहत आहे. तर, संजना ही अजूनही आपल्या कुटुंबाच्या शोधातच आहे. या सगळ्यातच आता आशुतोष केळकर याचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवले जाणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा नवा प्रोमो पाहून आता प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांच्या रागाचा पारा चांगलाच वाढवला आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष केळकर याचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आधीच आशुतोष केळकर हा अरुंधतीवर रागावलेला होता. अरुंधतीचे आपल्याकडे लक्ष नाही, ती सतत देशमुखांच्या घरात जात राहते. इतकंच नाही तर, ती जाऊन राहते म्हणून देखील आशुतोष तिच्यावर संतापलेला आहे. अरुंधती त्याची समजूत काढतच असते. मात्र, आशुतोषचा फोन कट होतो. आशुतोष आणि माया छोट्या अनुसोबत फिरायला गेले आहेत. याच वेळी त्याचा अपघात होणार आहे. या अपघातात आशुतोष केळकर याचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. आता आशुतोष केळकर यांच्या मृत्यूचं खापर आशुतोषची आई अरुंधतीवर फोडणार आहे.
या मालिकेच्या प्रोमोंवर वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. ‘ही आई फक्त नवीन नवीन लग्न करते..’, ‘माझ्या नवर्याची बायको पेक्षा ही मालिका अती झाली’, ‘यंदा तिसरा नवरा येणे आहे’, ‘एक तरी नाते एकनिष्ठ दाखवायचे, सर्वांचे दोन लग्न दाखवले आहेत, दोन बायका आणि दोन नवरे आता अजून त्यात काही वेगळे, सामान्य माणूस हे सर्व कार्यक्रम कुटुंबासोबत बघतात त्याचे तरी भान असावे, चांगले संस्कार दाखवले तर बरे होईल’, अशा कमेंट्स प्रेक्षक करत आहेत.