Actress Support to Maratha Morcha: सध्या महाराष्ट्रात भगवं वादळ आलं आहे. मराठा आरक्षण हा विषय आता चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत कूच केली आहे. आता हा मराठा मोर्चा मुंबईत आला आहे. मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले हे आंदोलन बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं. अगदी भूक-तहान विसरून मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत दौरा करत आहेत. त्यांच्या याच मोर्चाला आता ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने पाठिंबा दर्शवला आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
या आधी देखील अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने मराठा आरक्षण मोर्चाला आपले समर्थन दर्शवले होते. आता देखील तिने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘साधं फिरायला जावून घरी परतलो तरी पुढचे २ ते ३ दिवस "फार दमलो" म्हणत काढतो आपण. पण हा माणूस.. एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने, खरेपणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यात एक स्वप्नं आहे की, आता तरी न्याय मिळेल. हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणाप्रती असलेल्या सातत्याने, समाजाप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला, टिकवला, वाढवला.’
पुढे अश्विनी महांगडे हिने लिहिले की, ‘म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटते. हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल. टीप- माझे कलाकार म्हणून काम पाहणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत, तर ते १२ बलुतेदार, १८ पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा, असे अजिबात नाही, समाजातील सर्वच घटकांना समान न्याय मिळावा हेच माझे मत आहे.’
‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये ‘अनघा’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने आता मराठा आरक्षण मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता चाहते देखील आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'खूपच छान ताई एकदम परखड आणि ठाम मत', 'अशी ठाम भूमिका घेणार खूप कमी लोक आहेत धन्यवाद ताईसाहेब', 'ही खरी महाराष्ट्राची संस्कृती......जय शिवराय', अशा प्रतिक्रिया चाहते देताना दिसत आहेत.