छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्रने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत माया या पात्राची एण्ट्री झाल्यापासून काही तरी वेगळ्या गोष्टी मालिकेत घडत आहेत. आता माया आणि संजना या दोघीही एकत्र आल्या आहेत. त्या दोघी एकत्र येऊन नवा डाव तर रचणार नाहीत ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात सुलेखा ताई आल्यापासून त्या आशुतोषला नेमके काय झाले आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आशुतोष मनूला डेकेअरमध्ये जाण्यास परवानगी तर देतो. पण माया टीचरच्या डेकेअरमध्ये तो जाण्यास नकार देतो. हे ऐकून मनू नाराज होते. ती रागाच्या भरात खोलीमध्ये जाते आणि आतून लॉक लावून घेते. अरुंधती आणि सुलेखा ताई तिला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात. पण मनू काही ऐकायला तयार नसते. अरुंधतीला रडू कोसळते. ती मनूला समजवण्याचा प्रयत्न करते. पण आधी मनूच्या रडण्याचा आवाज येतो आणि नंतर तोही येणे बंद होते. त्यामुळे अरुंधती आणखी घाबरते. ती मायाला तेथे बोलावून घेते.
वाचा: "जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी असूनही...",'मनू'साठी मधुराणीने लिहिली खास पोस्ट
त्यानंतर अचानक माया आणि संजना यांची भेट होते. संजना तिच्या मुलांसाठी काही तरी साहित्य घेण्यासाठी आलेली असते. तर माया तिच्या डेकेअरमधील काही मुलांसाठी सामान आणण्यासाठी जाते. अचानक दोघी एकमेकांसमोर उभ्या राहतात. दोघींमध्ये शाब्दिक वार सुरु असतात. आता दोघील एकत्र येऊन देशमुखांच्या कुटुंबावर नवे संकट तर आणणार नाहीत ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. प्रेक्षकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगाम भागात मिळणार आहेत.