छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेत एका आईची कथा दाखवण्यात आली आहे. नवऱ्याने दुसरे लग्न केल्यावर एका महिलेवर ओढावलेली परिस्थिती, त्यानंतर दुसरा नवऱ्याचे निधन या सगळ्यात खचून न जाता जिद्दीने कसे समाजाचा सामना करायचे हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. आता अरुंधतीची एक वेगळी परीक्षा सुरु होती. ती महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग घेते. आता या मालिकेत काय होणार वाचा...
आईने मनात आणलं तर ती काय काय करु शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे आई कुठे काय करते ही मालिका. अरुंधतीचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी जवळून अनुभवला आहे. अनेक संकटं आली तरी अरुंधती कधीही डगमगली नाही. प्रत्येक संकटाचा तिने जिद्दीने सामना केला. अरुंधतीच्या आयुष्यातला असाच एक महत्त्वाचा टप्पा आई कुठे काय करते मालिकेत सध्या सुरु आहे.
देशमुख कुटुंबाचा अविभाज्य भाग अर्थातच समृद्धी बंगल्यावर अनिरुद्ध आणि संजनाने हक्क दाखवला आहे. समृद्धी निवासाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची अत्यंत गरज होती. त्यामुळेच तिने महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेत मिहीर शर्मासोबत सहभाग घेतला. अनेक नवनवे पदार्थ तिने या स्पर्धेत करुन दाखवले. अनिरुद्ध आणि संजनासारखे प्रतिस्पर्धी असल्यावर विघ्न येणार हे काही नव्याने सांगायला नको. अरुंधतीच्या वाटेत असंख्य अडथळे आणण्याचं काम अनिरुद्ध आणि संजनाने केले. मात्र हे अडथळे पार करत अखेर अरुंधती महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा जिंकणार आहे. अंतिम फेरीत अरुंधती आणि मिहिरने मिळून फणासाचं सांदण, अळुचं फतफतं आणि केळफुलाची भाजी असे पारंपरिक पदार्थ बनवले आहेत.
वाचा: 'हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार', अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट
अरुंधतीच्या आयुष्यातला हा विजय महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रियांना संघर्षाचं नवं बळ देणारा ठरेल यात शंका नाही. अरुंधतीचा विजेतेपदाचा हा प्रवास सर्वांना आनंद देणार आहे. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.