Aai Aani Baba Retire Hot Aahet New Serial: मराठी मनोरंजन विश्वात सध्या मालिकांनी चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तर, या दरम्यान काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप देखील घेतला आहे. अशातच आता आणखी काही नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज होणार आहेत. यात निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेची वर्णी लागली आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक आता मालिकेसाठी आतुर झाले आहेत. तर, आता यातील निवेदिता सराफ यांना बघून नेटकऱ्यांना जुन्या अरुंधतीची आठवण येत आहे.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ असं या मालिकेचं नाव असून, या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अद्याप या मालिकेतील इतर कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या प्रोमोमध्ये निवेदिता सराफ एका आईच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी एका अशा आईची भूमिका साकारली आहे, जी घरासाठी सतत धावपळ करत असते. अगदी मुलगा आणि सुनेच्या डब्यापासून ते नातवंडांच्या शाळेच्या तयारीपर्यंत ती सगळं काही करत आहे. दुसरीकडे, बाबा म्हणजेच मंगेश कदम आता त्यांच्या कामातून रिटायर होत आहेत. तर, कामातून निवृत्तीनंतर आरामात गावी जाऊन राहायचं असं त्यांनी ठरवलं आहे.
मात्र, आता आईला बाबांचा हा निर्णय पटलेला नाही. आपल्या मुलांना आणि घराला सोडून गावी जाणं आईला पटलेलं नाही. त्यामुळे आता काय घडणार हे मालिकेतूनच कळणार आहे. मात्र, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांना नेटकऱ्यांना ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सुरुवातीला दिसलेल्या अरुंधतीची आठवण आली आहे. हा प्रोमो रिलीज होताच आता त्यावर भरभरून कमेंट्स येत आहेत.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘अरुंधती अल्ट्रा प्रो मॅक्स लवकरच येत आहे.’ तर, आणखी एकाने लिहिले की, ‘आई कुठे काय करते २.०’. ‘आई बाबांना कधीच मुलं आणि सुना रिटायर होऊ देत नाहीत. हाच मालिकेचा कॉन्सेप्ट दिसतोय. छान’, ‘आसावरी २.०’, ‘बागबानची स्टोरी नक्कीच’ अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.