Aadesh Bandekar Birthday : 'दार उघड वहिनी... दार उघड' म्हणत समस्त महिला वर्गाचे लाडके भाऊजी बनलेले आदेश बांदेकर आज (१८ जानेवारी) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे 'महाराष्ट्राचे लाडके भावोजी' अशी आदेश बांदेकर यांची ओळखच बनली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अगदी सामन्य माणसांच्या घरघरांत पोहोचले. पण, त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. म्हणतात ना की, संघर्ष कुणालाच चुकत नाही, तसंच काहीस आदेश बांदेकर यांच्याबाबतीत देखील आहे. आजवर आदेश बांदेकर यांनी अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मात्र, त्यांना खरी ओळख 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने मिळवून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून २० वर्षांहून अधिक काळ या शोची धुरा सांभाळली. आज वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
आदेश बांदेकर यांचा १८ जानेवारी १९६६ रोजी अलिबागमध्ये झाला. मात्र, त्यांचं बालपण लालबाग- परळमध्ये गेलं. तीन भावंडांमध्ये आदेश बांदेकर हे सगळ्यात खोडकर होते. त्यांचे मन अभ्यासात फारसे रमायचे नाही. मात्र, नाटकुली किंवा सांस्कृतिक समारंभ असला, की सगळ्यात पुढे आदेश यांचं नाव असायचं. आपले बीकॉमचे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदेश यांनी हळूहळू मनोरंजन विश्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
आदेश बांदेकर यांनी कधीकाळी नारळ विकण्याचे काम देखील केले होते. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता की, नारळी पौर्णिमेच्या दिवशी ते पहाटे लवकर उठून काळाचौकीच्या नाक्यावर नारळ विकण्याचे काम करायचे. त्यातून चार पैसे सुटायचे आणि इतर ठिकाणी कामी यायचे. याच दरम्यान ते एक छोटी नोकरी देखील करत होते आणि वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांमध्ये भाग देखील घेत होते.
कोणत्याही प्रकारचं विशेष प्रशिक्षण न घेता देखील आदेश बांदेकर ढोल वाजवण्याच्या कलेत निपुण आहेत. ढोल वादनाची आवड त्यांच्यात बाळपणीच निर्माण झाली होती. ते नवरात्र, गणपती मिरवणुकांमध्ये ढोल वादन करायचे. इतकंच काय तर त्यांनी अनेकदा लग्नाच्या वरातींमध्ये देखील ढोल वाजवण्याचे काम केले आहे.
एकीकडे नोकरी करत असतानाच आदेश बांदेकर आपली आवड देखील जोपासत होते. याच दरम्यान त्यांना 'ताक धिना धीन' या कार्यक्रमाच्या सूत्र संचलनाची ऑफर आली. या कार्यक्रमातून ते पहिल्यांदाच स्क्रीनवर ठळकपणे दिसले. त्यांनी काही नाटकांनंतर आपला मोर्चा मालिकांकडे वळवला. त्यांच्या 'अवघाची संसार', 'अवंतिका' यासारख्या मालिका गाजल्या.
आदेश बांदेकर यांनी सप्टेंबर २००९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असलेल्या 'शिवसेने'मध्ये प्रवेश केला होता. मात्र, २००९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहिम मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली त्यांचे काम सुरू ठेवले होते.
संबंधित बातम्या