A Valentines Day Marathi Movie: आज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सगळीकडे निकालाचे आणि जल्लोषाचे वारे वाहत असतानाच ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातील 'डोन्ट वरी' गाणं प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे बोल फार आकर्षित करणारे आहेत. ‘डोन्ट वरी जरा... बंडखोरी करा... या ना पक्षात या... घुसखोरी करा’ असे बोल असलेल्या या गाण्याचे सोशल मीडियावर अनेक मीम्स बनले आहेत. त्यामुळे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. रत्नागिरी सुपुत्र फैरोज माजगांवकर ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून मराठी चित्रपट सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर चक्क ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित करण्यात आले.
शिवाय ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला. हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून, अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय अदिन माजगांवकर आणि अली माजगांवकर हे बालकलाकार देखील आहेत. तसेच, या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आहेत. येत्या ७ जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे म्हणाले की, ‘मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच माझ्या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित झालं, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तसंच, आता डोन्ट वरी हे गाणंसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे माझ्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा चित्रपट नक्कीच लोकांच्या मनावर राज्य करेल आणि लोकांच्या पसंतीस पडेल, ही अपेक्षा मी व्यक्त करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव जरी प्रेमावर आधारित असलं, तरी यामागे दडलेलं भयानक कृत्य आहे, ते तुम्हाला चित्रपटगृहातच पाहायला मिळेल. माझी रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की, या चित्रपटातील टीज़र आणि गाण्यांना तुम्ही जो प्रतिसाद दिलात तोच प्रतिसाद ७ जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नक्की द्याल. आणि आपला मराठी चित्रपट यशाच्या शिखरावर घेवून जाल.’