मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरात शिरला चोर; पाळीव मांजराने हुशारी दाखवल्याने टाळला मोठा अनर्थ!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरात शिरला चोर; पाळीव मांजराने हुशारी दाखवल्याने टाळला मोठा अनर्थ!

मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरात शिरला चोर; पाळीव मांजराने हुशारी दाखवल्याने टाळला मोठा अनर्थ!

Aug 27, 2024 10:28 AM IST

स्वप्ना जोशी यांच्या घरात झालेला हा चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या चोरापासून घरातील लोकांना सावध करण्यात पाळीव मांजराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Swapna joshi:मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरात शिरला चोर
Swapna joshi:मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरात शिरला चोर

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या मुंबईतील घरी चोरी झाली आहे. त्यांच्या घरात शिरलेला चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. स्वप्ना जोशी या अंधेरी पश्चिम भागातील एका मोठ्या इमारतीत राहतात. या इमारतीतील सहाव्या मजल्यावर त्यांचे घर आहे. चोराने ड्रेनेज पाईपचा आधार घेऊन, खिडकीद्वारे त्यांच्या घरात शिरकाव केला होता. टीशर्ट आणि हाफ पँट घातलेला हा चोर पाईपच्या आधारे वर चढला. रविवारी पहाटे ३.१० ते ३.३०च्या दरम्यान ही घटना घडली आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर स्वप्ना यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत, तक्रार नोंदवली आहे.

स्वप्ना जोशी यांच्या घरात झालेला हा चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या चोरापासून घरातील लोकांना सावध करण्यात पाळीव मांजराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या मांजरामुळेच चोरी उघडकीस आली आणि संभाव्य धोका टळला आहे. हा चोर त्यांच्या घरात शिरल्यानंतर त्याने मांजराकडे पाहिलं आणि तो किचनच्या दिशेने वळला. या दरम्यान त्याने हॉलमधील वस्तूंवर देखील आपली नजर फिरवली. यानंतर त्याने बेडरूममध्ये डोकावून पाहिलं आणि तो पुढे गेला.

TMKOC: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!

चोराने फक्त पैसे चोरले

पुढच्या खोलीत दिग्दर्शिकेची आई बेडवर झोपली होती. तर, त्यांची केअर टेकर खाली झोपली होती. तर, त्या पुढच्या बेडरूममध्ये स्वतः स्वप्ना झोपल्या होत्या. हा चोर त्यांच्या रुममध्ये शिरणारच होता, तितक्यात तिथे कुत्रा असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो बाहेर आला. त्यावेळी तो किचनजवळून सरकतोय याकडे मांजराचे लक्ष गेले. इतक्यात तो तिसऱ्या बेडरूममध्ये शिरला. या रूममध्ये स्वप्ना यांची मुलगी आणि जावई झोपले होते. या रुममध्ये शिरताच चोराने तिथे ठेवलेलं पाकिट उचलून त्यातून ६ हजार रुपये काढले. मात्र, समोरच ठेवलेल्या लॅपटॉपकडे त्याचे लक्ष गेलं नाही. किंवा पुन्हा पाईपवरून उतरताना त्रास होईल या विचाराने चोराने कदाचित लॅपटॉप उचलला नाही.

मांजरामुळे झाली चोरी उघड

तो चोर तिसऱ्या रुममध्ये शिरताच मांजराने देखील आता शिरून स्वप्ना यांचे जावई देवेन यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देवेन देखील डोळे चोळत उठले आणि त्यांना हा सगळा प्रकार लक्षात येताच ते चोर चोर म्हणून ओरडू लागले. त्यावेळी त्यांनी चोराला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, चोराने थेट खिडकी बाहेर उडी टाकून खाली जाण्याचा प्रयत्न केला. या चोरीच्या प्रयत्नामुळे स्वप्ना जोशी यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या घटनेत काहीतरी भयंकर घडू शकले असते, अशी चिंता त्यांना सतत सतावत आहे. त्यांनी आंबोली पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

Whats_app_banner