तुमचा, आमचा आणि सगळ्यांचा लाडका ‘शक्तिमान’ परत येतोय! प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तुमचा, आमचा आणि सगळ्यांचा लाडका ‘शक्तिमान’ परत येतोय! प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

तुमचा, आमचा आणि सगळ्यांचा लाडका ‘शक्तिमान’ परत येतोय! प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Nov 11, 2024 03:23 PM IST

Shaktimaan 2 : नव्वदच्या दशकात ‘शक्तिमान’ हा मुलांचा सर्वात आवडता शो असायचा. आता तब्बल १९ वर्षांनंतर शक्तिमान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

शक्तिमान
शक्तिमान

Shaktimaan 2 Teaser : बॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. मुकेश खन्ना पुन्हा एकदा ‘शक्तिमान’च्या भूमिकेत पुनरागमन करणार आहेत. या शोची पहिली झलकही त्याने चाहत्यांना दाखवली आहे. ‘शक्तिमान’ हा ९०च्या दशकातील लहान मोठ्यांना आवडणारा शो होता. मुकेश खन्ना यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर ‘शक्तिमान २’चा टीझर ही रिलीज केला आहे. मुकेश खन्ना यांच्या या बातमीने त्यांचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. ‘शक्तिमान २’च्या घोषणेमुळे त्यांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत.

मुकेश खन्ना यांनी शेअर केली पहिली झलक!

अभिनेते मुकेश खन्ना यांनी नुकतीच त्यांच्या युट्युब वाहिनीवर शेअर केली आहे. याशिवाय त्यांनी सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोवर लिहिलं आहे, ‘लवकरच येतोय.’ हा फोटो शेअर करताना मुकेश खन्ना यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आता त्याच्या पुनरागमनाची वेळ आली आहे. आपला पहिला भारतीय सुपर टीचर - एक सुपर हिरो. हो! अंधार आणि दुष्टता आजच्या मुलांना व्यापून टाकत असताना... त्याची परत येण्याची वेळ आली आहे. त्याच्याकडे एक मेसेज आला होता. आता तो आजच्या पिढीसाठी एक संदेश घेऊन परतत आहे. स्वॅगर.’

शक्तिमानच्या टीझरबद्दल बोलायचे झाले, तर मुकेश खन्ना टीझरमध्ये एका शाळेत उडताना दिसत आहेत. मग, शक्तिमान म्हणजेच मुकेश खन्ना अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो पाहून एक गाणे गाताना दिसतात. या टीझरमध्ये शक्तिमानचे पार्श्वसंगीतही ऐकायला मिळत आहे.

शक्तिमान भारताचा पहिला सुपरहिरो!

शक्तिमान’ हा शो दूरदर्शनवर १९९७ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता. या शोमध्ये मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ नावाच्या सुपरहिरोची भूमिका साकारली होती. कॉमन लाईफ जगणारी व्यक्ती सुपरहिरो कशी असते, हे या शोमध्ये दाखवण्यात आलं होतं. सामान्य जीवनात मुकेश खन्ना यांच्या व्यक्तिरेखेचे नाव गंगाधर होते. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडच्या शेवटी शक्तिमान मुलांना एक अनमोल धडा द्यायचा. आता पुन्हा एकदा या नव्या पिढीला खास संदेश देण्यासाठीच शक्तिमान छोट्या पडद्यावर परतणार आहे.

‘शक्तिमान २’चा हा नवा कोरा टीझर पाहून सगळेच खूप खूश झाले आहेत. या शोची नवी अपडेट कधी येतेय याची वाट देखील सगळेच बघत आहेत.

Whats_app_banner