मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  8 Don 75: '८ दोन ७५' नेमकं आहे तरी काय? नव्या मराठी चित्रपटाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

8 Don 75: '८ दोन ७५' नेमकं आहे तरी काय? नव्या मराठी चित्रपटाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Oct 24, 2023 12:14 PM IST

8 Don 75 Marathi Movie: '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

8 Don 75 Marathi Movie
8 Don 75 Marathi Movie

8 Don 75 Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. यातही ऐतिहासिक आणि हटके विषय असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एका महत्त्वाच्या, वेगळ्या व संवेनशील विषयावर भाष्य करणाऱ्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या नव्या वर्षात १९ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटाच्या हटके नावामुळे तो प्रचंड चर्चेत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याशिवाय आजवर फ्रान्स, सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पद्दुचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९०पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. एका आगळ्यावेगळ्या व संवेदनशील विषयावर आधारित हा चित्रपट आहे. मात्र, चित्रपटासारख्या माध्यमातून या विषयाची हाताळणी कशी केली आहे, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना १९ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा शर्वाणी - सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, अक्षय मिटकल अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत.

WhatsApp channel