Who Is This Actor? : बॉलिवूडमध्ये अनेकदा असं घडतं की, एखादा अभिनेता काही कारणास्तव एखादा प्रोजेक्ट सोडतो आणि मग तोच प्रोजेक्ट दुसऱ्या अभिनेत्याकडे जातो, जो नंतर ब्लॉकबस्टर हिट ठरतो. काही कलाकारांचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरतो आणि त्यांचे इंडस्ट्रीत दमदार पदार्पण होते. तर काहींना पदार्पणानंतर काही वर्षे वाट पाहावी लागते. त्यानंतर एखादं मोठ्या हिटने त्यांचे नशीब बदलून जाते. अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया, ज्याची सुरुवात खूप दमदार होती. पण, नंतर त्याने एक-दोन नव्हे तर चार फ्लॉप सिनेमे बॅक टू बॅक दिले, ज्यामुळे त्याची कारकीर्द धोक्यात आली होती.
बॉलिवूडचा हा अभिनेता आहे हृतिक रोशन... हृतिक रोशनने २०००मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिषा पटेल महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. हा चित्रपट प्रदर्शित होताच हृतिक रोशनला एकापाठोपाठ एक लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ लागले होते. त्यानंतर लगेचच त्याने 'कभी खुशी कभी गम' नावाचा चित्रपट दिला, ज्यात तो शाहरुख खानसोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला होता. पण, यानंतर त्याने एक-दोन नव्हे तर, सलग चार फ्लॉप चित्रपट दिले आणि यामुळे त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.
'आप मुझे अच्छे लग लगे', 'ना तुम जाने ना हम', 'मुझसे दोस्ती करोगे' आणि 'मैं प्रेम की दिवानी हूं' हे हृतिकचे चारही चित्रपट फ्लॉप ठरले. यानंतर हृतिक रोशनच्या कारकिर्दीवर आणि त्याच्या स्टारडमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि त्यानंतर दोन वर्षांनंतर त्याने प्रीती झिंटासोबत 'कोई मिल गया' नावाचा चित्रपट दिला जो ब्लॉकबस्टर हिट ठरला. त्यानंतर २००४ साली त्याने 'लक्ष्य' केला आणि त्यालाही प्रेक्षकांचे फारसे प्रेम मिळाले नाही. मात्र, हृतिकसाठी टर्निंग पॉईंट ठरला तो त्याच्या वडिलांचा 'कोई मिल गया' हा चित्रपट, ज्याचे नंतर काही आणखी भाग आले.
त्यानंतर हृतिक रोशनला २००६ साली 'धूम' हा चित्रपट मिळाला, ज्यात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. पण फार कमी लोकांना माहित आहे की, हृतिक रोशनला ब्लॉकबस्टर हिट ठरलेल्या अनेक चित्रपटांची ऑफर आली होती. पण हृतिकने हे चित्रपट नाकारले, ज्यामुळे या चित्रपटांमुळे नंतर इतर स्टार्सचे नशीब उघडले. यात अभिषेक बच्चनचा चित्रपट 'बंटी और बबली' आणि शाहरुख खानचा 'मैं हूं ना', 'लगान', 'दिल चाहता है' आणि 'रंग दे बसंती' या चित्रपटांचा समावेश होता.