मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  36 Gunn Review: ३६ गुण जुळूनही लग्न टिकवण्यासाठी संघर्ष

36 Gunn Review: ३६ गुण जुळूनही लग्न टिकवण्यासाठी संघर्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 04, 2022 11:20 AM IST

Santosh Juvekar: या चित्रपटात संतोष जुवेकर, पूर्वा पवार आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन समित कक्कड यांनी केले आहे.

36 गूण
36 गूण (HT)

लग्न म्हटलं की वर आणि वधूची पत्रिका पाहिली जाते. या पत्रिकेतील ३६ गुण पैकी किती गुण जुळतात हे सर्वात आधी पाहिले जाते. पण काहींचा या सगळ्यावर विश्वास ही नसतो. मात्र, याच विषयावर आधारीत, सध्याच्या नवविवाहीत जोडप्यांना रिलेट करणारा ३६ गुण हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, पूर्वा पवार आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन समित कक्कड यांनी केले आहे.

३६ गुण चित्रपटात संतोष जुवेकरने सुधीर शेलार ही भूमिका साकारली आहे. तर पूर्वा पवारने क्रिया. तसेच काऊंसिलरच्या भूमिकेत अभिनेता पुष्कर श्रोत्री आहे. चित्रपटाची सुरुवात ही सुधीर आणि क्रियाच्या भांडणाने होते तेही लंडनला हनिमुनला गेलेले असताना. क्रिया ही अतिशय बोल्ड विचारांची, बिनधास्त आणि स्वत:च्या विश्वात रमणारी मुलगी आहे. तर सुधीर हा क्रियाच्या एकदम विरुद्ध देवधर्म, कुटुंब आणि चौकटीत राहणारा मुलगा आहे. पत्रिकेतील ३६ गुण जुळल्यानंतर क्रिया आणि सुधीर लग्न करतात. त्यानंतर ते हनिमुनला लंडनला जातात आणि त्यांच्या आयुष्यात अनेक बदल होतात. त्यांच्यामध्ये तू तू मैं मैं सुरु होते. एकमेकांना समजून घेणे त्यांना कठीण होते. चित्रपटाची सुरुवातच त्यांच्यामध्ये होणाऱ्या भांडणाने झाल्यामुळे पुढे चित्रपटात काय पाहायला मिळणार याची कल्पना प्रेक्षकांना येईल.

क्रिया आणि सुधीर यांच्या लग्नाला वर्ष होण्यास १५ दिवस बाकी असतात. पण सतत होणाऱ्या भांडणांमुळे ते दोघे घटस्फोट घेण्याचा विचार करतात. त्यासाठी ते काऊंसिलर डॉ. गोडबोलेकडे जातात. गोडबोले हा स्वत: घटस्फोटीत असतो. पण तो क्रिया आणि सुधीर यांची कथा ऐकत असतो. सुधीरच्या क्रियाकडून काही अपेक्षा असतात आणि क्रिया ही मनाला वाटेल ते करणारी, आजच्या काळातील बोल्ड मुलगी असते. तिला गळ्यात मंगळसूत्र घालायला, कपाळाला टिकली लावायला, हातात हिरव्या बांगड्या घालायला आवडत नाहीत. याच्या अगदी उलट सुधीर. त्याला त्याची बायको कपाळाला टिकली लावणारी, गळ्यात मंगळसूत्र घालणारी हवी असते. क्रिया सुधीरला बदलण्याचा प्रयत्न करते आणि सुधीर तिचं मन राखण्यासाठी सर्व काही करत असतो. मात्र, क्रिया कधीही सुधीरच्या मनासारखे वागत नाही किंवा करत नाही. दरम्यान, ते हनिमुनला गेले असताना क्रियाच्या एक्स बॉयफ्रेंडची एण्ट्री होते. आता चित्रपटात नेमकं काय घडतं? क्रिया आणि सुधीरचा घटस्फोट होतो का? क्रिया पुन्हा एक्स बॉयफ्रेंडकडे जाते का? असा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

संपूर्ण चित्रपट क्रिया आणि सुधीर यांच्या भूतकाळातील आठवणीत रमतो. चित्रपटातील काही सनी उगाचच भूतकाळात घेऊन जातात अशी भावना येते. तर काही सीन एकमेकांना जोडण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला. लंडनमधील चित्रीकरण करताना दिग्दर्शकाने अगदी बारीक गोष्टींकडे लक्ष दिले आहे. एक भारतीय तरुण परदेशात गेल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतो हेही दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे दोन तासात जवळपास ७० पेक्षा जास्त वेगवेगळी ठिकाणं पाहायला मिळतात. लंडनमधील ही ठिकाणं पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय उत्तम आहे. क्रिया आणि सुधीर यांच्यामधील संवाद हे अगदी खरे वाटतात.

पूर्वा पवारच्या अभिनया विषयी बोलायचे झाले तर ती सध्याच्या तरुण पिढीला आपलीशी वाटणारी आहे. तिचा वेस्टर्न लूक, ड्रेसिंग स्टाइल अतिशय हटके आहे. लंडनमधील क्रिया आणि भारतात आल्यावर साडी नेसणारी क्रिया या दोन्ही भूमिका तिला उत्तमरित्या जमल्या आहेत. संतोषही अतिशय वेगळ्या भूमिकेत आहे. आजवर त्याला थोड्या वेगळ्या लूकमध्ये सगळ्यांनी पाहिले आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका ही अगदीच वेगळी आहे. एक वेगळा संतोष प्रेक्षकांसमोर आला आहे. एकंदरीत ३६ गुण हा चित्रपट आजच्या पिठीला आपल्या जवळ असल्याचे जाणवेल.

३६ गुण चित्रपटाला 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'कडून ३.५ स्टार

WhatsApp channel

विभाग