मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  १२ तासांचं काम माझ्याकडून अर्ध्या तासांत करून घ्यायचे! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत बॉलिवूडमध्ये दुजाभाव

१२ तासांचं काम माझ्याकडून अर्ध्या तासांत करून घ्यायचे! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत बॉलिवूडमध्ये दुजाभाव

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 12, 2024 08:46 AM IST

बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांवर कसा अन्याय होतो, हे तृप्ती खामकर हिने तिच्या मुलाखतीत सांगितलं आहे.

१२ तासांचं काम माझ्याकडून अर्ध्या तासांत करून घ्यायचे! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत बॉलिवूडमध्ये दुजाभाव
१२ तासांचं काम माझ्याकडून अर्ध्या तासांत करून घ्यायचे! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत बॉलिवूडमध्ये दुजाभाव

मराठी कलाकार आता केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवत आपला दबदबा निर्माण करत आहेत. सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, नेहा पेंडसे, वनिता खरात यांच्यानंतर आता अभिनेत्री तृप्ती खामकर हिने देखील बॉलिवूड चित्रपटात एन्ट्री घेतली आहे. अभिनेत्री तृप्ती खामकर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या करिना कपूर-खान, तब्बू आई क्रिती सेनन अभिनित ‘क्रू’ या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या चित्रपटाच्या मेकर्सवर मोठे आरोप केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांवर कसा अन्याय होतो, हे तृप्ती खामकर हिने तिच्या मुलाखतीत सांगितलं आहे. नुकतीच तृप्ती खामकर हिने एका वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘क्रू’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्यावर अन्याय केल्याचे म्हटले आहे. तसेच, ‘क्रू’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कधीही मुख्य अभिनेत्रींबरोबर काम करण्याची संधी तिला मिळाली नाही, याचा खुलासा देखील तिने केला आहे. इतकंच नाही तर, शूटिंग करत असताना तृप्तीला पूर्ण स्क्रिप्ट देखील दिली जात नव्हती.

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’चा दबदबा; ‘मैदान’ला मिळाला धोबीपछाड! पाहा कलेक्शन...

१२ तास कॅमेरा फक्त त्यांच्यावर...

याबद्दल बोलताना तृप्ती म्हणाली की, ‘जेव्हा तुम्ही एखाद्या सुपरस्टार बरोबर काम करता, तेव्हा साहजिकच आधी त्यांचे काम होते आणि ते घरी निघून जातात. त्यानंतर तुमचे काम सुरू होते. अनेकदा बारा तासांच्या शिफ्टमध्ये सगळे कॅमेरे त्यांच्यावरच असायचे. त्यावेळी मी तिथे उभी राहून केवळ माझे संवाद पाठ करायचे. त्या तिघी अभिनेत्री जेव्हा शूटिंग करून निघून जायच्या, तेव्हा माझ्याकडे अवघा अर्धा तास उरलेला असायचा आणि पूर्ण दिवसाचे अर्थात बारा तासाचे काम माझ्याकडून शेवटच्या अर्ध्या तासात करून घेतले जायचे. मी देखील या गोष्टीसाठी तयार व्हायचे आणि अर्ध्या तासात काम पूर्ण करायचे.’

या सगळ्याचा त्रास व्हायचा!

बारा तासांचे काम अवघ्या अर्ध्या तासात करायला लागत असल्याने तृप्तीला देखील त्रास व्हायचा. याशिवाय तिला कोणती स्क्रिप्ट मिळायची नाही. त्यामुळे तिला सतत प्रत्येक सीनवर लक्ष ठेवून रहावे लागायचे. आता कोणता सीन चित्रित केला जात आहे, याकडे ती बारकाईने लक्ष ठेवून असायची. इतकं सगळं करूनही तिला मुख्य अभिनेत्रींबरोबर काम करण्याची एकही संधी मिळाली नाही. ‘क्रू’मध्ये काम केल्यानंतर आता ती हिंदी चित्रपट येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकते, असं म्हणतेय. तृप्ती खामकरी हिने आतापर्यंत मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘तुम्हारी सुलु’, ‘झोंबिवली’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘गोविंदा मेरा नाम’ अशा अनेक चित्रपटात ती झळकली आहे.

IPL_Entry_Point