Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे यांनी सामनाला रोखठोक मुलाखत दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून यात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात फिरत आहेत. ते अनेक सभा राज्यात घेत आहेत. उद्या ते गल्लीत देखील फिरतांना दिसतील. त्यांनी महाराष्ट्र बघावा. महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळालं. पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं. घर फोडणं, पक्ष फोडणं हे कौरवांचं काम आहे. ही कौरवनीती असून ते हरणार आहेत. कौरव त्यावेळी १०० होते. तर पांडव पाचच होते. पाच पांडवांनी कौरवांवर मात केली होती. पांडव सत्याच्या बाजूने होते. त्यामुळेच श्रीकृष्ण पांडवाच्या बाजूने होते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी, अमित शहा आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
संजय राऊत यांना मुलाखत देतांना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाण्यात फक्त पवार-ठाकरेच दिसत आहेत. आम्ही त्यांना कायमचे पाणी पाजू. मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते त्यांना अनुभवावे लागणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी त्यांना सध्याच्या निवडणुकीबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले, ही निवडणूक ही महाभारतासारखी सुरू आहे. त्यावेळच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. मात्र आता लोकशाहीचं वस्त्रहरण होत आहे. लोकशाही वाचवण्यासाठीची आमची लढाई आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यानंतर हे स्वातंत्र्य मिळाले. आज हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम करणे गरजेचे आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. संविधान पाळले जात नसून त्याचा अपमान केला जात आहे. पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस अजूनही तिचा निकाल लागत नाहीये. या बाबत वारंवार कोर्टानं फटकारे मारलेत. खडे बोल सुनावलेत. तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते, त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? त्यांनी अधिवेशन बोलावलं ते कसं चूक होतं, त्याच्यानंतर लवादाने दिलेला निर्णय कसा चूक होता, निवडणूक आयोगालासुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? याचं कारण सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय, पक्ष पुणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत. म्हणजेच काय सध्या लोकशाहीचं वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजूनही याचा निर्णय आलेला नाहीये.
सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार याची मला खात्री आहे. कारण तसं घटनेमध्ये नमूदच आहे. परिशिष्ट दहा! सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थार्पन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला 'नकली शिवसेना' म्हणतायत. याचा अर्थ उघड आहे... निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. लवादानेसुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये, असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतायत की काय, असा प्रश्न पडलेला आहे.
उद्धव ठाकरे यांनी इलेक्ट्रोरल बॉन्ड घोटाळ्याची तुलना अमेरिकेतील वॉटरगेट प्रकरणाशी केली आहे. या प्रकरणात राष्ट्रपति निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. भ्रष्टाचार केल्यानंतर तेवढी नीतिमत्ता निक्सनकडे होती. मात्र, मोदी यांनी या प्रकरणी मौन बाळगले आहे. या घोटाळ्यातील पैसा भाजप मतं विकत घ्यायला वापरतायत.
गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या थापा उघड झाल्या आहेत. २०१४ मध्ये ते जे काही बोलले, ते त्यांना २०१९ मध्ये आठवत नव्हतं. २०१९ मध्ये जे बोलले ते आज आठवत नाही. आज जे बोलले ते उद्या आठवणार नाही. त्यांना वाटतं त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला असला तरी जनतेच्या झाला असं नाही. जनता १० वर्ष मूर्ख बनली. तुम्ही कदाचित सर्वांना एकवेळ मूर्ख बनावल. पण सदैव मूर्ख बनवू शकत नाही. जनता पेटलेली आहे. उठलेली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या