Sanjay Raut slams Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला पाठिंबा देण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. 'राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यांनी स्वत: याची उत्तरं द्यावीत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात काल राज ठाकरे यांनी भाजप, शिंदे व अजित पवार गटाच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला. त्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर राज ठाकरे यांना घेरलं आहे. संजय राऊत यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत राज यांच्यावर टीका केली आहे.
'महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे. जे घाणेरडं राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार मोदी-शहा हे आहेत. मुंबईला विकलांग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील उद्योग पळवले जात आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष अशावेळी महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका येणारच. राज ठाकरे यांनी त्याची उत्तर द्यायला हवीत, असं राऊत यांनी सुनावलं.
‘असं काय घडलं की राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा लागला? राज ठाकरेंच्या पक्षाचा नमोनिर्माण पक्ष का झाला? अशी अचानक काय गरज पडली? तुम्हाला अमित शहा यांनी अशी कोणती फाईल दाखवली?,' अशी प्रश्नांची सरबत्तीच संजय राऊत यांनी केली.
राज्यातले ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी भाजपनं स्वत:कडं घेतलेत. वॉशिंग मशीनमध्ये धुतलंय. हा व्यभिचार नाही का? राज ठाकरे हे त्यातले एक आहेत का? याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. अजित पवार, हसन मुश्रीफ भाजपसोबत का गेले हे सर्वांना माहीत आहे. ह्यांचंही तसं झालं असेल असं मी म्हणणार नाही. पण भाजपचा व्यभिचार जगजाहीर आहे. अशा लोकांशी कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही राऊत यांनी हाणला.
'शिवसेना ही अटलबिहारी व आडवणी यांच्या काळापासून भाजपसोबत होती. मात्र, भाजपनं खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही जबडा फाडून बाहेर आलो. आज आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत. आम्ही शरणागती पत्करणार नाही. उद्धव ठाकरे यांना झुकवण्याचा प्रयत्न झाला. ते झुकले नाहीत. आम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुटलो नाही. महाराष्ट्राला आज लढणाऱ्यांची गरज आहे,' असं संजय राऊत म्हणाले.