Ajit Pawar Vs Amol Kolhe : शिरूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करणारे आणि कलाकार लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मला उमेदवारी देऊन तुम्ही चूक केली, मग तुमच्या सोबत येण्यासाठी दहा वेळा निरोप का पाठवले,’ असा बिनतोड प्रश्न कोल्हे यांनी अजित पवारांना केला आहे.
अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत युती केल्यानंतर अमोल कोल्हे हे सोबत येतील, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, कोल्हे हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानं अजित पवार संतपाले आहेत. शिरूरच्या निवडणुकीत कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
सोमवारी शिररूमध्ये झालेल्या एका शेतकरी मेळाव्यात त्यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली होती. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकारांना उमेदवारी देतो, पण त्यांना लोकांशी काही देणंघेणं नसतं, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन, गोविंदा, हेमा मालिनी अशा लोकांचा दाखलाही दिला होता.
अजित पवार यांच्या या टीकेला कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करून अत्यंत मुद्देसूद आणि संयमी उत्तर दिलं आहे. 'अजित पवार सेलिब्रिटी म्हणून मला हिणवतात आणि माझी तुलना इतर सेलिब्रिटींशी करतात. पण ज्यांच्याशी ते माझी तुलना करतात, त्यांना कधीही संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही. मी माझ्या मतदारसंघाचे आणि सार्वजनिक हिताचे प्रश्न मांडून तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला आहे, असं कोल्हे यांनी सांगितलं.
अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावलं. 'तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले नेतेही संसदेत खासदार आहेत. त्यांच्यापेक्षाही माझी संसदीय कामगिरी उजवी आहे, हे कोल्हे यांनी निदर्शनास आणलं.
मी राजीनामा देणार होतो असं अजित पवार सांगतात. पण मी संसदेत उपस्थित राहणं बंद केलं होतं का? तिथं बोलणं सोडून दिलं होतं का, की प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं, असा उलट सवाल कोल्हे यांनी केला.
अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन चूक केली असं अजित पवार म्हणाले होते. त्याचाही कोल्हे यांनी समाचार घेतला. ‘याच चुकीच्या माणसानं आज अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांना निवडून आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली होती. विधानसभेच्या प्रचारातही मी होतो. राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणी अजित पवारांची चौकशी सुरू झाली तेव्हा मी आणि जयंत पाटील यांनीच ही यात्रा पुढं नेली. त्याबद्दल खुद्द अजित पवारांनीच माझं कौतुक केलं होतं. आता भूमिका बदलल्यामुळं तुमची भाषा बदललीय का? मी इतका चुकीचा आहे तर मला तुमच्या पक्षात येण्यासाठी दहा-दहा वेळा निरोप का पाठवले? लपूनछपून माझ्या भेटीगाठी का घेत होतात,' अशी प्रश्नांची सरबत्तीच कोल्हे यांनी केली.
देशात मोदींचीच हवा आहे आणि एनडीएच निवडून येणार आहे हे अजित पवारांचे दावेही अमोल कोल्हे यांनी खोडून काढले. भाजपचे अनेक उमेदवार तिकीट जाहीर होऊनही माघार घेत आहेत. त्यामुळं भाजपमध्ये फार आलबेल आहे असं नाही. याउलट पाटण्यात 'इंडिया' आघाडीची १५ लाखांची सभा झाली होती, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
संबंधित बातम्या