Ajit Pawar in Shirur : कुणी मिळालं नाही की आम्ही कलाकारांना उभं करतो; कोल्हेंवर टीका करताना अजित पवारांनी गुपितच फोडलं!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ajit Pawar in Shirur : कुणी मिळालं नाही की आम्ही कलाकारांना उभं करतो; कोल्हेंवर टीका करताना अजित पवारांनी गुपितच फोडलं!

Ajit Pawar in Shirur : कुणी मिळालं नाही की आम्ही कलाकारांना उभं करतो; कोल्हेंवर टीका करताना अजित पवारांनी गुपितच फोडलं!

Mar 04, 2024 03:44 PM IST

Ajit Pawar targets Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक (Shirur Lok Sabha Election) अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

कुणी मिळालं नाही की आम्ही कलाकारांना उभं करतो; कोल्हेंवर टीका करताना अजित पवारांनी गुपितच फोडलं!
कुणी मिळालं नाही की आम्ही कलाकारांना उभं करतो; कोल्हेंवर टीका करताना अजित पवारांनी गुपितच फोडलं!

Shirur Lok Sabha election 2024 : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एक वेगळंच गुपित फोडलं आहे. ‘निवडणुकीत आम्हाला चांगला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकारांना उमेदवारी देतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळं कलाकारांना मोठ्या संख्येनं उमेदवारी देणाऱ्या पक्षांची मोठी गोची झाली आहे.

लोकसभा निवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली तरी सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं प्रचार सुरू केला आहे. विशेषत: हायप्रोफाइल मतदारसंघात शाब्दिक चकमकी झडू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या बंडाला साथ न देता शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले शिरूरचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या अजित पवारांच्या रडारवर आहेत. कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार अजित पवारांनी केला आहे. शिरूरमधील मांडवगण फराटा इथं आज झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा कोल्हेंवर टीका केली.

'मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं, पण नंतर काही दिवसांनी हा बाबा राजीनामा द्यायला निघाला. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येत नाही. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलंय, असं म्हणत होते. मुळात कोल्हे यांचा पिंड राजकारणाचा नाही. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

आपण राजबिंडा पाहून निवडून देतो, पण…

'राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले, मग त्यांनी राजीनामा दिला. त्यांना मतदारांचं काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलानं काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

आता म्हणतील मी काम करेन!

'लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. पण आत्ताही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करतायेत, ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे, पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचाही विचार करा, असं अजित पवार म्हणाले.

आता आमच्यात फाटलंय!

पवार कुटुंबातील दुफळीमुळं मतदारांंमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी यावेळी पुन्हा एकदा केला. ‘आपला वेगळा फाटा आहे, त्यांचा वेगळा फाटा आहे. आजही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? पण, आता आमच्यात फाटलं आहे. उगीच मनात काही शंका ठेवू नका,’ असं अजित पवार म्हणाले.

Whats_app_banner