Satara Lok Sabha Constituency : सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळं ही जागा कोणाकडं जाणार याविषयी उत्सुकता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सध्या तिथं शरद पवार यांच्या पक्षाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. उदयनराजे भोसले यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत. त्याआधी उदयनराजे हे राष्ट्रवादीच्याच तिकिटावर निवडून आले होते. नंतर ते भाजपवासी झाले. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र, पुन्हा एकदा लोकांमधून निवडून जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी शिंदे यांच्या शिवसेनेनंही या जागेसाठी शड्डू ठोकला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सातारा जिल्ह्यात शिवसेनेला अनुकूल वातावरण आहे. लोकांचाही उत्तम प्रतिसाद आहे. त्यामुळं ही जागा आपल्याकडं घ्यावी, असा आग्रह जाधव यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडं धरला.
पुरुषोत्तम जाधव यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांपुढं आकडेवारीच सादर केली. '२००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार म्हणून मला दोन लाख ३४ हजार ५६ मतं पडली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कारण नसताना ही जागा मित्र पक्षाला सोडण्यात आली. त्यावेळी अपक्ष लढून मी एक लाख ५६ हजार मतं घेतली. त्यावेळी देशात मोदी लाट असतानाही मला देशातील अपक्ष उमेदवारांमध्ये क्रमांक दोनची मते पडली आहेत, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
'आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिवदूत आणि बूथ प्रमुखांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारनं हजारो कोटी रुपये निधी दिला आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यात शिवसेनेसाठी सकारात्मक वातावरण आहे. आपण स्वत: सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात. त्यामुळं हा मतदारसंघ आपल्याकडं राहिल्यास उद्याचा खासदार हा शिवसेनेचाच असेल, असा विश्वास जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडं बोलून दाखवला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यामुळं जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.