Sanjay Raut on Raj Thackeray : पुण्यात शुक्रवारी महायुतीची सभा झाली. या सभेत मनसे नेते राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसला मतदान करण्यासाठी मशिदीतून मौलवी फतवे काढत असल्याची टीका केली होती. तसेच ठाकरे यांनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मतदान करण्यासाठी हिंदू धर्मियांना फतवा काढत असल्याचे सांगत मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनावर खासदार संजय राऊत यांनी आक्रमक होत आज राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पत्रकारांशी बोलतांना राऊत म्हणाले, राज ठाकरे हे महाराष्ट्रद्रोही लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसलेत. काही नेते आणि काही पक्ष यांचा फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातील स्थिती नाही, अशी टीका देखील त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
पुण्यात सारस बागेजवळ मुरलीधरल मोहोळ यांच्या प्रचारसाठी महायुतीची सभा झाली. या सभेत राज ठाकरे हे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. तसेच अजित पवार यांनी कधीही जातीयवाद केला नाही असे म्हणत त्यांचे कौतुक करत शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या वक्तव्याचा समाचार खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.
राऊत म्हणाले, महाराष्ट्रात तसेच देशात सध्या संविधान वाचवण्याची मोठा लढा सुरू आहे. अशा स्थितीत राज ठाकरेंसारखे काही नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यांच्या या वागणुकीचा प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना न केलेली बरी. अमित शाह, नरेंद्र मोदीं हे महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे शत्रू आहेत हे सांगणारे हे सद्गृहस्थ आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात याबद्दल ईडीचे आभार असे संजय राऊत म्हणाले.
अरविंद केजरिवाल यांना कोर्टाने जामीन दिल्याबद्दल राऊत म्हणाले. केजरिवाल यांना जामीन देतांना कोर्टाने ईडीला फटकारले. राजकीय सूडबुद्धीतून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आता जामीन मिळाल्याने ते आता प्रचारात सहभागी होऊ शकतील. त्यांना जामीन मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वागत केले, अभिनंदन देखील केले. मी देखील त्यांच्याशी बोललो आहे. १७ तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची सांगता सभा आहे. त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित केले आहे. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.
संबंधित बातम्या