Sanjay Raut on Ajit Pawar : राज्यात आज ११ मतदार संघात मतदान होत आहे. सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघाची निवडणूक देखील आज आहे. या निवडणुकीवरून खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांचा मोठा विजय होणार आहे. मात्र, मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांचे पतीराज अजित पवार यांनी त्यांना बळीचा बकरा बनवले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पावर यांच्यावर वरील टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील टीका केली. संजय राऊत म्हणाले, बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव करून मोदी व शाहांना दाखवून द्यायचे आहे की, गुजरातच्या व्यापाऱ्यांनी पैशाच्या ताकदीवर व तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला. बारामतीची लढाई ही राज्याच्या अस्मितेची, स्वाभिमानाची लढाई असून तसे होणार नाही. या लढाईत सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी होईल. राज्यात महायुतीचे अनेक उमेदवार परभवाच्या छायेत असून ते पुन्हा दिसणार नाहीत असे देखील राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, मोदी आणि अमित शहा यांना राज्यात येण्यासाठी वेळ आहे. त्यांच्या अनेक प्रचारसभा राज्यात झाल्या आहेत. आता ते मुंबईत येणार आहे. नरेंद्र मोदी यांनी पेडर रोडला तर अमित शाह यांनी बोरिवलीत घर भाड्याने घेतले आहे. निवडणूक होईपर्यंत ते येथेच राहणार आहे. त्यांना सध्या दुसरे काही काम नाही. पान त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना त्यांचा पराभव करेल. मोदींना मुंबईत येऊ द्या. तरीही मुंबईत ठाकरे गटच जास्त जागा जिंकेल, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समाचार घेतला. एकनाथ शिंदे हा एक खोटारडा माणूस असल्याचे राऊत म्हणाले. जो माणूस आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतो, त्यांच्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवता? हे डरपोक लोक आहेत , घाबरून पळालेले लोक आहेत, असे राऊत म्हणाले. या सोबतच नारायण राणे हे पराभवाचा चौकार मारतील असेही राऊत म्हणाले.