मराठी बातम्या  /  निवडणुका  /  सांगलीत वारं फिरलंय..! विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी हट्ट धरणारे विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रिय

सांगलीत वारं फिरलंय..! विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी हट्ट धरणारे विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रिय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 28, 2024 05:08 PM IST

Sangli Loksabha : सांगलीतून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत लढणारे विश्वजीत कदम महाआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रीय झाल्याने विशाल पाटलांना मोठा धक्का बसला आहे.

विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रिय
विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रिय

Sangli Lok Sabha :विशाल पाटील यांच्या बंडखोरीने सांगली लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. यावेळी सांगलीत तिरंगी सामना होणार आहे. सांगली जिल्हा व लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे लोकसभा लढण्यास इच्छुक असलेले काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरही विशाल पाटील व विश्वजीत कदम (vishwajit kadam) यांनी दिल्लीवारी करून आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच ठाकरेंना सांगलीबाबत फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र याचा काही फायदा न झाल्यावर अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.

मात्र विशाल पाटील यांनी बंड केल्यानंतर व काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची सूचना केल्यानंतर विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी गेले अनेक महिने प्रचंड धावपळ करणारे आमदार विश्वजीत कदम काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कदम यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करत मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याने विशाल पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारानिमित्त विश्वजीत कदमयांचा आमदारकीचा मतदारसंघ असलेल्या पलूस तालुक्यात नुकतीच एक बैठक पार पडली.

विश्वजीत कदम चंद्रहार पाटील यांच्या बाजुने गेल्यास विशाल पाटील यांना मोठा धक्का बसू शकतो. कारण पलूस-कडेगावसह संपूर्ण सांगली जिल्ह्यातविश्वजीत कदम यांची मोठी  ताकद आहे. पलुस इथं झालेल्या बैठकीबाबत चंद्रहार पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,आज खटाव,  ब्रम्हनाळ, माळवाडी, भिलवडी (ता. पलूस) येथे माजी मंत्री विश्वजीत कदम, आ. अरुण आण्णा लाड, महेंद्र लाड, शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली.

दरम्यान, विशाल पाटीलयांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीचे मतविभाजन होऊन भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना फायदा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सांगलीचा निकाल काय लागणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

WhatsApp channel