मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sangli Congress : सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, जिल्हा कार्यालयावरील ‘तो’ शब्द हटवला

Sangli Congress : सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, जिल्हा कार्यालयावरील ‘तो’ शब्द हटवला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 12, 2024 06:16 PM IST

Sangli Loksabha Election : काँग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. मिरज तालुका काँग्रेस समिती बरखास्त केल्यानंतर आज सांगलीतील जिल्हा कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला गेला.

संतप्त कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा कार्यालयावरील ‘काँग्रेस शब्द हटवला
संतप्त कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा कार्यालयावरील ‘काँग्रेस शब्द हटवला

Sangli Congress Workers Aggressive : सांगलीच्या लोकसभा जागेववरून महाविकास आघाडीत बरीच खडाजंगी झाल्यानंतर अखेर ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली. त्यानंतर काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना सांगलीबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र सांगलीची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सांगली लोकसभा मतदार संघातून (Sangli Lok Sabha Constituency) विशाल पाटील (Vishal Patil) निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र काँग्रेसचा हा गड ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केल्यानंतर सांगलीतील काँग्रेस भवन इमारतीवरील काँग्रेस शब्दच पुसून टाकला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी विश्वजीत कदम (vishwajeet kadam) यांनी दिल्लीपर्यंत मजल मारली होती. जिल्हा काँग्रेस व महाराष्ट्र काँग्रेसकडून अनेक प्रयत्न करूनही सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे आला नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते व सोशल मीडियावर‘आमचं काय चुकलं’ असे मेसेज व्हायरल होते होते. त्यानंतर आता कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

सांगलीतील जिल्हा कार्यालय काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंग लावून हा शब्द पुसून टाकला आहे. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर फलक होता. संतप्त कार्यकर्त्यांनी यातील काँग्रेस शब्दच पुसून टाकला आहे.

त्यापूर्वी कार्यकर्त्यांनी मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव मंजूर केला होता. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचे लोण जिल्ह्यातील सर्व तालुका काँग्रेस समित्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही आक्रमक भूमिका घेत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा न करताच मिरजेतील सभेत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चा सुरू होते. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉट रिचेबल झाले होते. मात्र नेत्यांकडून अद्याप कोणताही मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयांवर चाल करून चालले आहेत. काँग्रेसचे नेते यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

WhatsApp channel