Raj Thackreay MNS Gudipadwa Melava 2024 : गुढीपाडव्यानिमित्त आज शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आज राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापले असतांना राज ठाकरे हे महायुतीत जाण्याची चर्चा होती. ठाकरे हे दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटले. असे असले तरी अद्याप महायुतीत बाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज या चर्चांना राज ठाकरे हे पूर्ण विराम देण्याची शक्यता आहे. गेल्या दोन निवडणुकांत मनसेचे उमेदवार नव्हते. मात्र, आता या निवडणुकीत ठाकरे महायुतीत सामील होणार का; की स्वतंत्र उमेदवार उभे करणार या कडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज संध्याकाळी ७ वाजता शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी मनसेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्टेजच्या शेजारी मोठ्या एलईडी स्क्रीन लावल्या असून आज राज ठाकरे कोणता व्हिडिओ लावणार या कडे देखील सर्वांच्या नजारा आहेत. गेल्या वेळेला त्यांनी माहीम येथील दर्ग्याच्या व्हिडिओ दाखवला होता. तर या वेळेला लोकसभा निवडणुका असल्याने राज ठाकरे नेमके काय दाखवणार या बाबत उत्सुकता ताणली आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. मनसेला महायुतीत सामील करून घेण्याबाबत भाजप आणि मनसेत चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हे महायुतीच्या बाजूने असतील असे व्यक्तव्य केले आहे. राज ठाकरे हे या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटले होते. दरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली हे पुढे येऊ शकले नाही. मात्र, असे असले तरी मनसे महायुतीत सहभागी होऊन लोकसभेच्या काही जागा लढवतील अशी चर्चा होती. मात्र, राज ठाकरे दिल्लीहून येऊन सुद्धा महायुतीत सहभागी होण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप मनसेचे बिनसले असल्याचीही चर्चा होती. मनसेला महायुतीत घेतल्यास अमराठी मतदार नाराज होईल, अशी भीती भाजपला असल्याची चर्चा होती. दरम्यान, त्यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रमुखपदाची ऑफर दिल्या गेल्याचीही चर्चा होती. मात्र, जागावाटपावरून भाजप मनसे युतीचे बिनसल्याची चर्चा होती. या बाबत ठाकरे यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते, त्यामुळे आज गुढीपाडव्याच्या सभेत पडद्यामागील गोष्टी राज ठाकरे समोर आणणार आहेत.
गेल्या दोन निवडणुकांचा विचार करता राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उतरवले नव्हते. मात्र, या वर्षी होणाऱ्या निवडणुकी बाबत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राज ठाकरे आज होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात कोणती भूमिका घेणार? ते कुणाला त्यांचा पाठिंबा देणार ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी या गुढीपाडव्या मेळाव्याचे काही दिवसांपूर्वी टीझर जाहीर केले होते. त्यांच्या आवाजात असलेले हे टीझरवरून देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. राज ठाकरे यांनी जनतेला आवाहन करत मला तुमच्याशी बोलायचे आहे अशी भूमिका जाहीर केली होती. मनसे बद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात असून मी शांतपणे या कडे पाहत असल्याचे ठाकरे म्हणाले. आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली असल्याचे ठाकरे म्हणाले होते.
मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर हा सोहळा होणार आहे. या वेळी मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होणार आहे. हा मेळावा ५.३० सुरू होणार असून राज ठाकरे यांच्या पूर्वी नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि प्रकाश महाजन यांची भाषणे होण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरे हे ७.३० वाजता भाषण करण्यासाठी मंचावर येणार आहे. आजच्या मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, किशोर शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.
संबंधित बातम्या